Drugs in Parcel Sent by FedEx Courier by Cyber Thieves in Pune

  पुणे : सायबर चोरट्यांकडून फेडेक्स कुरिअरद्वारे पाठविण्यात आलेले पार्सलच्या पॅकेटमध्ये ड्रग्ज सापडले असून, मुंबई क्राईम ब्राँचमधून बोलत असल्याची बतावणी करून एका तरुणीला २३ लाख रुपयांना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणीला ड्रग्जप्रकरणात गुन्हा नोंद केला असल्याचे सांगत भिती दाखवली असल्याचे दिसून येत आहे.

  चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार

  याप्रकरणी २९ वर्षीय तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून स्काईपधारक व मोबाईल धारक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वडगाव शेरीत राहण्यास असून, उच्चशिक्षीत असून,एका कंपनीत नोकरी करते.

  तरुणीचे बँक खाते चेक करण्याचा बहाणा

  दरम्यान, तरुणीला एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला व फेडेक्समधून आलेल्या पार्सल डिलीव्हरीसाठी थांबवले आहे. त्यात पाच अवैध पासपोर्ट, एक लॅपटॉप, तीन किलो कपडे आणि साडेसहा ग्रॅम ड्रग्ज सापडला आहे. त्याविरोधात मुंबई क्राईम ब्रँच येथे गुन्हा दाखल केला आहे, असे खोटे सांगण्यात आले. त्यांना स्काईप आयडीवरून फसविण्याकरता चौकशी करण्याच्या बहाण्याने आरपीआय ऑफिसमधून आरबीआयचे अधिकारी बोलत असल्याचे भासवले. तसेच, तरुणीचे बँक खाते चेक करण्याच्या बहाणा केला. खाते चेक केल्यानंतर तरुणीला कारवाईची भिती दाखवत २२ लाख ९५ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडत तिची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

  शेअर ट्रेडींगद्वारे दहा लाखांची फसवणूक
  शेअर मार्केटमधील गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीला ९ लाख ८४ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी वाघोली येथील ४० वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार जयवंती डेनियल, स्नॅफ, स्वाती पटेल, लॉरेन्स, अर्जुन के गुप्ता, मोबाईलधारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी इंस्टाग्रामद्वारे तक्रारदारांशी संपर्क साधला. त्यानंतर शेअरट्रेडींग गुंतवणूकीची एक लिंक पाठवून त्यांना ए-वन, झिरो सेवन स्टॅक फॅमिली क्लब या व्हॉटस्अप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले. नंतर गुंतवणूकीवर नफा झाल्याचे सांगत  गुंतवणूकीची रक्कम परत पाहिजे असल्यास वीस टक्के नफा शेअरिंग फिस भरावी लागेल असे म्हणत ९ लाख ८४ हजार रुपये भरले.