मध्य रेल्वेप्रमाणे पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सुद्धा एसी लोकलला प्रवाशांचा विरोध, एसी लोकलमुळं गर्दीवर मोठ्या प्रमाणात परिणाम

सलग एसी लोकल सोडल्यामुळं या सर्व लोकल रिकाम्या जातात. आणि मागील येणाऱ्या लोकलवर प्रचंड ताण येत, मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. त्यामुळं ह्या एसी लोकल बंद करुन या ठिकाणी द्वितीय श्रेणीच्या लोकल सोडण्यात याव्यात अशी संतप्त प्रवाशांनी मागणी केली आहे.

    मुंबई : एसी लोकलच्या (AC Local) फेऱ्या वाढल्यानं प्रवाश्यांनी कळवा (Kalwa) रेल्वे स्थानकात आज आंदोलन केलं. हे ताजे असताना आता पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मार्गावर सुद्धा यासारखीच परिस्थिती आहे. वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यात वाढ केल्यामुळं सकाळी सात ते नऊच्या वेळेत प्रवाशांच्या गर्दीत कमालीची वाढ होत आहे. सलग एसी लोकल सोडल्यामुळं सामान्य चाकरमानी किंवा ज्यांना जेमतेम पगार आहेत, असे प्रवाशी दिड-दोन हजार पास काढू शकत नाहीत, तसेच दिडशे ते दोन रुपयांचे तिकिट सुद्धा परवडत नाही, त्यामुळं सेंकड क्लासमधून (Second class) प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. पण सलग एसी लोकल सोडल्यामुळं या सर्व लोकल रिकाम्या जातात. आणि मागील येणाऱ्या लोकलवर प्रचंड ताण येत, मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय. त्यामुळं ह्या एसी लोकल बंद करुन या ठिकाणी द्वितीय श्रेणीच्या लोकल सोडण्यात याव्यात अशी संतप्त प्रवाशांनी मागणी केली आहे.

    दरम्यान, सध्या विरारवरुन सकाळी साडेसात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत द्वितीय श्रेणीच्या लोकल मोजक्या प्रमाणात आहेत, तर एसी लोकलच्या लोकल सलग असल्यामुळं याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असून,  मागील येणाऱ्या द्वितीय श्रेणीच्या लोकलमध्ये तुफान गर्दी होत असून, अपघाताची सुद्धा भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं लवकरात लवकर एसी लोकल कमी करुन द्वितीय श्रेणीच्या लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील प्रवाशांनी केली आहे.