राखमिश्रित पाण्यामुळे खसाळा, मसाला, कवठा, खैरी गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका

राख बंधाऱ्यातून दुपारी १२ वाजेपासून ओव्हरफलो पाण्याचा विसर्ग वाढतच आहे. नैसर्गिक आपदा लक्षात घेता संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षीततेचा इशारा तातडीने देण्यात आला आहे. वीज केंद्र प्रशासन आणि जिल्हा प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे.

    नागपूर : कोराडी औष्णिक वीज प्रकल्पाचा खसाळा राख बंधारा फुटला असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राखमिश्रीत पाण्याच्या पुरामुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हे राखमिश्रित पाणी खसाळा, मसाला, कवठा, खैरी गावांमधील नाल्यांमधून वाहत आहे. हे पाणी नाल्यावाटे कोलार आणि कन्हान नदीतही गेले असल्याची माहिती असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.

    मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने, परिसरातील नदी, नाले, तलाव ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, अतिवृष्टीने कोराडी वीज केंद्रालगत खसाळा राख बंधारा येथील पाण्याची पातळी वाढल्याने फुटला. या बंधाऱ्यातून खसाळा, मसाळा, खैरी, कवठा गावांमधून नाल्याचे पाणी वाहत आहे. याबाबत कळताच कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता व संबंधित अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

    राख बंधाऱ्यातून दुपारी १२ वाजेपासून ओव्हरफलो पाण्याचा विसर्ग वाढतच आहे. नैसर्गिक आपदा लक्षात घेता संबंधित गावांना सतर्कतेचा आणि सुरक्षीततेचा इशारा तातडीने देण्यात आला आहे. वीज केंद्र प्रशासन आणि जिल्हा प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. खसाळा राख बंधारा ३४१ हेकटर क्षेत्राचा असून सुमारे ७ किलोमीटर आतील जागेत राख साठवण करण्यात येते. शनिवारी या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला. पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्धस्तरीय काम सुरू आहे.