शालार्थ क्रमांक नसल्यामुळे शिक्षक वर्षानुवर्षे बिनपगारी, २७ सप्टेंबरला करणार आंदोलन

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार थेट त्यांच्या बॅक खात्यात जमा होतात. त्यासाठी शिक्षकांना शालार्थ वेतन क्रमांक दिला जातो. मात्र मागील दोन ते सहा वर्षांपासून मान्यता नेमणूक मिळालेल्या शिक्षकांना शालार्थ क्रमांक देण्यास चालढकलपणा होत आहे. त्यामुळे या शिक्षकांचा पगार रखडला आहे.

    मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शालार्थ क्रमांक न मिळाल्याने मुंबईतील नेमणूक मान्यता मिळालेले अनेक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक वर्षानुवर्षे बिनपगारी काम करीत आहेत परिणामी, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील हे शिक्षक २७ सप्टेंबरला वाशी येथील मुंबई विभागीय शिक्षण मंडळासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. मार्चमध्ये पार पडलेल्या बारावी परीक्षा कामकाजाचे मानधनही या शिक्षकांना मिळालेले नाही. हे मानधनही लवकरात लवकर मिळण्याची मागणी यावेळी शिक्षकांकडून केली जात अाहे.

    कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार थेट त्यांच्या बॅक खात्यात जमा होतात. त्यासाठी शिक्षकांना शालार्थ वेतन क्रमांक दिला जातो. मात्र मागील दोन ते सहा वर्षांपासून मान्यता नेमणूक मिळालेल्या शिक्षकांना शालार्थ क्रमांक देण्यास चालढकलपणा होत आहे. त्यामुळे या शिक्षकांचा पगार रखडला आहे. या प्रकरणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष उपासनी यांच्याकडे याप्रकरणी पाठपुरावा केला होता. त्यावेळी त्यांनी शालार्थ क्रमांक ३१ मार्चपर्यंत देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर सहा महिने उलटले तरी शिक्षकांना शालार्थ क्रमांक देण्यात आलेले नाहीत त्यामुळे या शिक्षकांची उपासमार सुरू असल्याचे संघटनेचे समन्वयक प्रा.मुकुंद आंधळकर यांनी सांगितले.

    दरम्यान,शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागासाठी सेवा हमी कायदा लागू करून त्यामध्ये शालार्थ क्रमांक एका महिन्यात देण्यात येईल अशी तरतूद केली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असल्याचेही प्रा. आंधळकर म्हणाले.