राज्यातील ‘डुप्लीकेट’ मुख्यमंत्र्यांची पुणे पोलिसांकडून धरपकड! एकावर गुन्हा दाखल

सांगलीचा 'डुप्लीकेट' ताब्यात तर तिसऱ्याचा शोध सुरू

  पुणे : राज्यातील ‘डुप्लीकेट’ मुख्यमंत्र्यांची पुणे पोलिसांकडून धरपकड सुरू असून, आंबेगावमधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सांगलीमधील दुसऱ्या ‘डुप्लीकेट’ला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, तिसऱ्याचा शोध घेतला जात आहे. हे तिघे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून राज्यभरात मिरवत होते. तर, त्यांच्या लैकिकास बाधा आणत असल्यावरून पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.

  याप्रकरणी आंबेगावमधील विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) याच्यासह इतरांवर बंडागार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी सरकारतर्फे तक्रार दिली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार माने आंबेगाव तालुक्यातील आहे. विजय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषाकरून फिरतो. नुकताच त्याचा व सराईत गुन्हेगार शरद मोहोळचा एकत्रित फोटो व्हायरल झाला. त्यात गुंड शरद मोहोळ खुर्चीवर बसलेला व त्या शेजारी विजय माने हा मुख्यमंत्र्यांची वेशभूषा करून उभारलेला दिसत आहे. तर, त्याशेजारी पोलीस देखील उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी या फोटोबाबत माहिती घेतली. त्यावेळी तो फोटो मुद्दाम व्हायरल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लैकिकास बाधा आणल्याचे दिसून आले. रात्री त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

  त्यासोबतच सांगली येथील कवटेपिरा जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने स्पर्धा आयोजित केली होती. त्याठिकाणी तमाशा देखील ठेवण्यात आला होता. त्या तमाशात सांगलीतील डुप्लीकेट मुख्यमंत्री भिमराव माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी बेषभूषा केली होती. तर, तो या कार्यक्रमात नाचताना दिसून आला. त्याचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही माहिती देखील मिळताच पोलीस निरीक्षक बालाची पांढरे व त्यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अशाच प्रकारे आणखी एका डुप्लीकेट सीएमचा शोध पुणे पोलिस घेत आहेत. त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेषभूषाकरून डुप्लीकेट एकनाथ शिंदे मिरवत असल्याचे दिसत आहे. पण, हे डुप्लीकेट नाचगाण्यात अन गुंडासोबत वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढत आहेत. ते व्हायरलकरून मुख्यमंत्र्यांचे लैकिकास बाधा आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

  तो फोटो श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील..!
  मुख्यमंत्र्यांसारखी वेषभूषाकरून गुंड शरद मोहोळ हा खुर्चीवर आणि त्याच्या शेजारी उभारहून काढलेला तो फोटो श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील असल्याचे समोर आले आहे. फोटोत या दोघांच्या शेजारी पोलीस देखील उभा असल्याचे दिसत होते. त्यामुळे फोटो नेमका कुठला असा प्रश्न विचारला जात होता. तो फोटो श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील आहे. नगर येथे नितेश राणे यांचा नुकताच एक मोर्चा झाला. लव्ह-जिहाद संबंधी. त्यात शरद मोहोळ देखील सामील होता. तर हा मुख्यमंत्र्यांची वेशभूषाकरून फिरणारा विजय माने देखील सहभागी झाला होता. ते पोलीस ठाण्यात गेल्यानंतर हा फोटो त्याने काढला आणि तो व्हायरल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिस उभा अन् गुंड खुर्चीवर असल्याने चर्चेला उधान आले होते. पण, फोटोची सत्यता समोर आणत पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान, हा विजय माने सध्या दिल्लीत आहे.

  दुसरा डुप्लीकेट नाचला तमाशात..!
  फोटो सारखाच एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात डुप्लीकेट मुख्यमंत्री झालेला भीमराव माने हा नाचला आहे. तो व्हिडीओ सांगली येथील आहे. कवटेपिरा जिल्हा परिषद सदस्य आणि टायगर ग्रुपने वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यासोबतच नाच गाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित केला होता. त्यात हा भीमराव मुख्यमंत्र्यासारखी वेषभूषाकरून नाचला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेषभूषाकरून फिरणाऱ्या तिसऱ्या एकाचा शोध पोलीस घेत आहेत. त्याच्यावर देखील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.