ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावेळी दादरमध्ये अज्ञातांनी फाडले भाजपचे बॅनर्स

    मुंबई : अनेक दिवसांपासून राज्यभर चर्चा असणाऱ्या शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा काल मुंबईत वेगवगेळ्या ठिकाणी पारपडला. या दोन्ही मेळाव्याला कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakery)यांनी भाषणात भाजप आणि शिंदे गटावर  जोरदार टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही भाषणा दरम्यान उद्धव ठाकरेंबाबत अनेक गौप्यस्फोट केले. दोन्ही मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र अशातही शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) ठाकरेंच्या शिवसेना दसरा मेळाव्यानंतर दादर (Dadar) परिसरात भाजपचे पोस्टर्स काही अज्ञात व्यक्तींकडून फाडण्यात आले.

    मुंबईत दादरमध्ये काल ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर या भागात भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले. शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा संपल्यानंतर पोस्टर फाडण्याची घटना घडली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांचे पोस्टर फाडण्यात आले .

    पोस्टर्स कुणी फाडले हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस या प्रकरणात चौकशी करत आहेत. ज्या ठिकाणी ठाकरेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा झाला, त्या शिवाजी पार्कपासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर भाजपचे पोस्टर्स फाडण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे समर्थकांनी हे पोस्टर्स फाडले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.