मंगळवेढ्यात भर दिवसा घरफाेडी, ६५ हजाराचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा शहर परिसरातील बंद घराचे भरदिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

मंगळवेढा : मंगळवेढा शहर परिसरातील बंद घराचे भरदिवसा कुलूप तोडून घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६५ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळवून नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान चोरटे बंद घरांना टार्गेट करीत असल्यामुळे बाहेर गावी जावे की नाही असा प्रश्न कुटूंबियांना चोरीच्या धास्तीमुळे पडला आहे.

फिर्यादी विशाल चव्हाण रुक्मिणीमाता नगर येथे रहावायास असून वडील भैरवनाथ शुगर कारखान्यात मुख्य शेती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दि. २८ रोजी सकाळी साडेनऊ वाजता वडील कारखान्यात गेले, बहिण जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्तव्यावर गेली असता फिर्यादीच्या आईने घराला व गेटला लॉक करुन ज्वारी काढण्यासाठी सोनलगी येथे गेली होते. कामे उरकून रात्री ११ वाजता घरी आल्यावर मुख्य दरवाजाचे लॉक तुटून खाली पडल्याचे दिसले. घरात जाऊन पाहिले असता घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेली दिसून आली. कपाटात डब्यात ठेवलेले ४५ हजार रुपये किंमतीचे दिड ताेळ्याचे सोन्याचे गंठण व पर्समध्ये ठेवलेले २० हजार रोख रक्कम असा एकूण ६५ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने चोरुन नेला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

कुलूपबंद घरे टार्गेट

आत्तापर्यंत झालेल्या चोऱ्या या कुलूपबंद घरामधील असून चोरटे बंद घराला टार्गेट करत असल्यामुळे कुटूंबाने कुठे बाहेर गावी जावे की नाही असा प्रश्न पडला आहे. पोलीसांनी आत्तापर्यंत बंद घराच्या झालेल्या चोऱ्याचा शोध घेवून चोरटयांना जेरबंद करावे, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.