
पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट असताना ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे. कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडणार आहे.
कुर्डुवाडी : पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारपेठेवर दुष्काळाचे सावट असताना ऐन सणासुदीच्या काळात डाळींचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे. कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडणार आहे. आर्थिक ताळमेळ जुळवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. यंदा पाऊस नसल्याकारणाने खरीप वाया गेला.शेतकरी वर्ग पुरता अडचणीत सापडला आहे. बाजारातील ग्राहकांची रेलचल कमी झाली आहे. महागाईमात्र आ वासून पुढे उभी राहीली आहे. सणसूद सुरु आहेत आणि सर्वच प्रकारच्या तुर डाळ, मुग डाळ, हरभरा डाळ, उडीद दाळ महाग झाल्या असून यांच्यासह उडीद, तुरीला देखील चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कहीं खुशी कहीं गम अशी अवस्था झाली.
तुरडाळीची वाटचाल २०० च्या दिशेने तर हरभरा दाळ १००, उडीद दाळ १५०, मुगदाळ १२० असे दर झाले असून उडीदाचा भाव १०० पर्यंत गेला आहे. त्यात आणखी एक भर म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मुळे अनेकांकडे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने दवाखाना, विविध चाचण्या, औषधे याचाच खर्च भागवता भागवता नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
सणासुदीमुळे प्रत्येक घरात डाळींचा वापर अधिक होत असतो. नेमके काही दिवसापूर्वी सिलेंडर दोनशेने काय स्वस्त झाले मात्र डाळीचे व इतर अन्नधान्याचे भाव कडाडल्यामुळे यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी दिवाळं ठरू नये म्हणजे झाले.
बाजारपेठेत मंदीचा परिणाम
सध्या बाजारात पूर्णपणे मंदी आहे. हौसमौस किंवा चैनेच्या वस्तू खरेदी करणे तर लांबच पण जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीही नागरिकांना चारवेळा विचार करावा लागत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सोडल्या तर बाजारात कसलीच रेलचेल दिसून येत नाही.
दैनंदिन खर्चात मोठी वाढ
महागाईमुळे नागरिकांचे मासिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक सर्वच वस्तंच्या किंमतीत वाढ झाल्याने दैनंदिन खर्चात मोठी वाढ झाली आहे. सरकारने यावर योग्य ती उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सध्या पाऊसपाणी नसल्याकारणाने समाधानकारक असे उत्पादन न झाल्याने बाजारात डाळींची आवक कमी झाल्याने भविष्यात डाळींचा दर २०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
- रवींद्र ठोकडे, आडत व्यापारी
भाजीपाला, फळे, डाळी व सर्वच अन्नधान्यांच्या किंमतीत वाढ झाली असून, सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करावी व डाळींचे इतर अन्नधान्यांचे दर आटोक्यात आणून सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना दिलासा द्यावा.
- सुहासिनी भोरे, गृहिणी
शेंगदाणा १३०-१५०
गहू ३०-४०
ज्वारी ४५-७०
तांदूळ. ४५-१५०
साखर. ४२
हरभरा डाळ ८५
मुग डाळ. १२०-१३०
तुर डाळ. – १८०
उडीद दाळवाले – १२०
मसूर डाळ. – १००
तुर. – १३०
उडीद. – ११०
गोडतेल. ९० -१२५
शाबुदाणा ९० -१००