भगवान गडावर दसरा मेळावा; वाद पेटण्याची शक्यता

करुणा मुंडे यांनीदेखील भगवान गडावर मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मी वंजारी समाजाची सून असल्याने मेळावा घेऊ शकते असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे या मेळाव्याचाही वाद पेटण्याची शक्यता आहे.

    बीड : दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्कवर कोणी मेळावा घ्यायचा, यावरून शिवसेना (Shivsena) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात मोठा वाद सुरू आहे. त्यातच आता करुणा मुंडे (Karuna Munde) यांनीदेखील भगवान गडावर (Bhagwangarh Melawa) मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मी वंजारी समाजाची (Wanjari Community) सून असल्याने मेळावा घेऊ शकते असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे या मेळाव्याचाही वाद पेटण्याची शक्यता आहे.

    करुणा मुंडे म्हणाल्या की, दसऱ्याला माझी मुलगी शिवानीचा वाढदिवसही असतो. शेतकरी संघटनांना सोबत घेऊन हा दसऱ्याला मेळावा घेणार आहे. यात अतुल खोपसे, विष्णू कसबे माझ्यासोबत असणार आहेत. लवकरच नामदेवशास्त्रींची याबाबत परवानगी मिळवण्यासाठी भेट घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.

    महाराष्ट्राची जनता समजूतदार आहे. मी एक सामान्य महिला नसून संघर्षवादी आहे. त्यामुळे मला भगवान गड, भगवानबाबा, नामदेवशास्त्री यांच्यावर विश्वास आहे. मुंडे घराण्याचे सुपूत्र सुशील मुंडेदेखील याठिकाणी येणार आहेत, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.

    मी पण दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये
    करुणा शर्मा म्हणाल्या की, मी महाराष्ट्राची अशी रणरागिणी आहे की माझे नाव घेताच लोक घाबरतात. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानते की, त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली. एकनाथ शिंदे हेच खरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये आता मी पण उतरली आहे. मी पण दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे.