gopichand padalkar
gopichand padalkar

आरेवाडी येथील श्रीक्षेत्र बिरोबा देवस्थान येथे रविवारी (दि. 2) रोजी दुपारी दोन वाजता दसरा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

    सांगली : आरेवाडी येथील श्रीक्षेत्र बिरोबा देवस्थान येथे रविवारी (दि. 2) रोजी दुपारी दोन वाजता दसरा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमुळे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारकडून लवकरच शेळ्या, मेंढ्यांचा विमा उतरविला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    आमदार पडळकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील अडीच वर्षात समाजाच्या एसटी आरक्षणाबाबत न्यायालयात सुनावणी झाली नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून गती आली आहे. आरक्षणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेेल, असा विश्वास आहे. राज्यात मेंढपाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतू चराऊ कुरणच शिल्लक राहिलेले नाही. मेंढ्या चरण्यावरुन मेंढपाळांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत. अन्यही प्रश्न आहेत. वनमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. चराऊ कुरणाचा प्रश्न मार्गी लागेल. गेल्या काही वर्षात शेळ्या-मेंढ्यांना सातत्याने रोगराईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मेंढपाळांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. सरकारच्या माध्यमातून शेळया-मेंढ्यांचा विमा उतरवला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. शेळी, मेंढी विकास महामंडळासह अनेक महामंडळाच्या अध्यक्षांच्या निवडी महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत झालेल्या नाहीत. या निवडी आता लवकरच होतील, असे पडळकर यांनी सांगितले.

    गेली तीन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे दसरा मेळावा घेता आलेला नाही. आता समाजातून दसरा मेळावा घेण्याची मागणी होवू लागली आहे. त्यामुळे आरेवाडीमध्ये २ ऑक्टोंबरला दसरा मेळावा घेतला जाणार आहे. आरेवाडीतील दसरा मेळाव्यात मेंढपाळ संघटनेची घोषणा करण्यात येणार आहे. राज्यभरातील मेंढपाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना प्रामुख्याने काम करणार आहे, अशी माहितीही आ पडळकर यांनी दिली. महाराजा यशवंतराव होळकर महाशेष योजना राज्य सरकार प्रभावीपणे राबवेल. सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर महाज्योती अंतर्गत विद्यार्थ्यांना सर्व सवलती आणि लाभ दिले जातील. राज्यात ओबींसी विद्यार्थ्यांची ७२ वसतिगृहे सुरू होतील. शिंदे-फडणवीस सरकारमुळे ओबीसींचे प्रश्न मार्गी लागतील. योजना कार्यान्वित होतील. एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही. एस.टी. कर्मचार्‍यांना न्याय देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.

    आटपाडीतील विरोधकांशी यापुढेही सामना
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी संबंधित आटपाडी तालुक्यातील आपल्या विरोधकाशी यापुढेही सामना सुरू राहील. लुबाडणूक करून घेतलेली अडीच हजार एकर जमिनीची फाईल तयार आहे. वरिष्ठांच्या लक्षात आल्यावर ते कारवाई करतील, असे आ. पडळकर यांनी सांगितले.

    आम्हांला हद्दपार करायला निघालेले जयंतराव सत्तेतून हद्दपार
    तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील सत्तेचा गैरवापर केला. कार्यकर्त्यांमार्फत दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे. माझ्या भावाला हद्दपार करायला निघालेल्या जयंतरावांनाच सत्तेतून हद्दपार व्हावे लागल्याची टीका आ. गोपीचंद पडळकर यांनी केली. सत्तेत असताना जयंत पाटील यांनी केवळ वाळवा तालुक्याच्या विकासासाठी निधी नेला. सर्व तालुक्यांना समान निधी दिला नाही. जिल्ह्यात मंत्री जास्त असतील तर अधिक विकास होतो, हे चुकीचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे तीन-तीन मंत्री होते, पण विकास किती झाला, असा प्रश्नही पडळकर यांनी उपस्थित केला.