पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवार म्हणाले, ‘कुणी टीका केली तर माझ्या…’

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) व त्यांच्या नावाने शरद पवारांवर केलेल्या टीकेची चर्चा सुरू आहे. राजकीय टीकेची पातळी घसरल्याची भूमिका सातत्याने राजकीय विश्लेषकांकडून मांडली जात आहे.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) व त्यांच्या नावाने शरद पवारांवर केलेल्या टीकेची चर्चा सुरू आहे. राजकीय टीकेची पातळी घसरल्याची भूमिका सातत्याने राजकीय विश्लेषकांकडून मांडली जात आहे. तसेच, राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडूनही यासंदर्भात इतर नेत्यांना टीका करताना बोलण्याचे भान ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. त्यासंदर्भात आता सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटाचे प्रमुख अजित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

    गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. गेल्या आठवड्यात गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना लक्ष्य करतानाच शरद पवारांवरही टीका केली. ‘धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नसल्याने धनगर आरक्षणाबाबत त्यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे’, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.

    विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत सोडून द्यायचे

    गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेसंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अजित पवारांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. ‘मी कुणाशी काहीही बोलत नाही. कुणी टीका केली तर माझ्या अंगाला भोकं पडत नाही. असल्या टीकेला मी विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतो आणि सोडून देतो. पण मीच चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीसांची वक्तव्य ऐकली आहेत. मला या गोष्टीला फार महत्त्व द्यायचे नाहीये. मी कामाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे’, असे अजित पवार यावेळी म्हणाले.