‘कौशल्य आहे हे कळून येईल’; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपला इशारा

राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरेच काही शिकतील. विधान परिषद निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून कोणाकडे कौशल्य आहे आणि नाही हे सुद्धा कळून येईल, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेत्यांना दिला.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राज्यसभेच्या अनुभवातून तिन्ही पक्ष बरेच काही शिकतील. विधान परिषद निवडणुकीमध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून कोणाकडे कौशल्य आहे आणि नाही हे सुद्धा कळून येईल, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप नेत्यांना दिला.
    बारामती येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    यावेळी उपमुख्यंत्री पवार म्हणाले, १८, १९, २० असे तीन दिवस सर्व आमदार मुंबईमध्ये थांबतील, अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. आम्ही सुद्धा आज मुंबईमध्ये जात आहोत. सर्व आमदारांना त्या ठिकाणी बोलावले आहे, महाविकास आघाडीमधील काही आमदार नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, सर्वांचीच शंभर टक्के कामे होत नसतात, सत्तेत असणारा आमदार आपली कामे पुढे नेत असतो, त्यामध्ये गैर काहीच नाही.

    भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अजितदादा स्पष्टवक्ते आहेत. आमच्यासोबत येऊन सरकार स्थापन करावे, अशी खुली ऑफर अजित पवार यांना दिली होती. याबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कुणी काही बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही जेथे आहोत, त्या ठिकाणी आमचं बरं चालले आहे, असे उत्तर दिले. ओबीसी जनगणनेबाबत बैठक होणार आहे.

    राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठक नुकतीच मुंबई येथे झाली आहे. घटनेनुसार राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च संविधानिक पद असल्याने या पदाचा व सर्वसामान्य जनतेचा संपर्क कमी होतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तीच भूमिका आमच्या पक्षाची देखील होती. आजपर्यंत पवारसाहेब सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करत आले आहेत. त्यामध्ये त्यांना समाधान मिळते, असे अजित पवार म्हणाले.