
गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पवार कुटुंबाची (Diwali Celebration) दिवाळी नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबीयांनी एकत्र साजरा केली. गोविंद बागेत पाडव्यादिवाशी गैरहजर राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रात्री मात्र गोविंद बागेत पत्नी सुनेत्रा पवार व पार्थ व जय या दोन मुलांसोबत उपस्थित राहून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळी साजरी केली.
बारामती / अमोल तोरणे : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पवार कुटुंबाची (Diwali Celebration) दिवाळी नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबीयांनी एकत्र साजरा केली. गोविंद बागेत पाडव्यादिवाशी गैरहजर राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रात्री मात्र गोविंद बागेत पत्नी सुनेत्रा पवार व पार्थ व जय या दोन मुलांसोबत उपस्थित राहून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्व कुटुंबातील सदस्यांसोबत दिवाळी साजरी केली. अजित पवार यांच्या बंडानंतर पवार कुटुंबियांमध्ये राजकीय दरी निर्माण झाली असली; तरी कौटुंबिक नात्यांची ‘वीण’ मात्र कायम असल्याचे दिसून आले.
आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात काका शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली अजित पवार यांनी केली. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आतापर्यंतची राजकीय वाटचाल अजित पवार यांनी केली. अनेक वेळा आपल्या भाषणात आपण जो काही आहे, ते शरद पवारांमुळेच!, अशी जाहीर कबुली त्यांनी अनेक वेळा माध्यमांसह जाहीरसभांमधून दिली आहे. कोणताही निर्णय त्यांचे काका असलेल्या शरद पवार यांच्या सूचनेशिवाय अथवा आदेशाशिवाय न घेणारे अजित पवार यांनी केलेले बंड महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गाजले. त्यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले.
या पार्श्वभूमीवर चक्क पक्षाच्या चिन्हावर आपला दावा करत त्यांचा हा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे यावर्षीची दिवाळी पवार कुटुंबीय एकत्र साजरा करणार का?, याबाबत माध्यमांसह जनतेमध्ये मोठी उत्सुकता होती. दिवाळीच्या अगोदर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना ‘आमची राजकीय भूमिका वेगळी असली; तरी कुटुंब म्हणून आम्ही एक’ असल्याचे सांगत यंदाची दिवाळी दरवर्षीप्रमाणे आम्ही एकत्रच साजरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
याचवेळी भिगवण या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानच्या अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. याचवेळी दोघे एकत्र येणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, या दोघांनीही तसेच इतर सदस्यांनी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
यानंतर दिवाळी तोंडावर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंगूची लागण झाल्याने, त्यांनी स्वतःहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण गर्दीपासून लांब राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, दिवाळीच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शारदोत्सव या प्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून बेला शेंडे यांचा अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचा आनंद पवार कुटुंबीयांनी एकत्र घेतला. त्यामुळे पाडव्याच्या गोविंद बागेतील कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का? असा नव्याने सवाल उपस्थित केला जात होता.
स्वतः सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अजित पवार गर्दी पासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट त्यांनी केले होते. मात्र, अजित पवार काटेवाडी येथील आपल्या निवासस्थानी दिवसभर होते. रात्री आठ नंतर ते शरद पवारांच्या ‘गोविंद बाग ‘या निवासस्थानी सहकुटुंब दाखल झाले. यावेळी शरद पवार, प्रतिभा सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, रणजीत पवार आदींसह पवार कुटुंबातील सर्व सदस्य व जवळचे नातेवाईक या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित होते.
अजित पवार यांनी सहकुटुंब या स्नेह मेळाव्याचा आनंद घेतला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या कौटुंबिक क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, कुटुंबातील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला असला तरी पवार कुटुंबातील कौटुंबिक नात्यांची ‘वीण’ मात्र घट्ट असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कुटुंबातील हाच कौटुंबिक जिव्हाळा त्यांनी जपल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे हेच गमक असल्याचे बोलवले जात आहे.
काटेवाडीतील घरी आज स्नेहभोजन
पाडव्याच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या कण्हेरी येथील ‘अनंततारा’ या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी एकत्र सनेहभोजन केले. आज (दि १५) सायंकाळी अजित पवार यांचे फार्म हाऊस व पूर्वीचे पवार कुटुंबाचे जुने घर असलेल्या निवासस्थानी पवार कुटुंबीयांचा भाऊबीज दिवशीचा कौटुंबिक सोहळा संपन्न होणार आहे.