
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमुठीचा (Vajramuth Sabha) फोटो मी पाहिला, त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमूठ आमचा मुकाबला करू शकत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी खिल्ली उडवली.
वाशिम : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमुठीचा (Vajramuth Sabha) फोटो मी पाहिला, त्याला भेगा पडलेल्या दिसत आहेत. अशी भेगा पडलेली वज्रमूठ आमचा मुकाबला करू शकत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी खिल्ली उडवली. तसेच आमची वज्रमूठ ही विकासाची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे भाजपा संकल्प सभेत ते बोलत होते. या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री डॉ. संजय कुटे, रणधीर सावरकर, नुकताच भाजपात प्रवेश केलेले अनंतराव देशमुख, नकुल देशमुख, लखन मलिक, हरिश पिंपळे, निलेश नाईक, तानाजी मुटकुळे, रणजित पाटील आणि इतरही नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीची अवस्था वाईट आहे. पहिला भोंगा सकाळी 9 वाजता वाजतो. त्याविरोधात दुसरा भोंगा दुपारी 12 आणि सायंकाळी तिसरा भोंगा पहिल्या दोघांनाही खोडून काढतो.
सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अनंतराव देशमुखांचा भाजपात प्रवेश झाला आहे. ओबीसी, दीनदलित अशा सर्व समाजघटकांसाठी आज केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार काम करते आहे. गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वांच्या जीवनात परिवर्तन करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे आणि त्यामुळेच अनंतराव देशमुखांनी, मोदीजींच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
समृद्धी महामार्गामुळे आजवर वेगळ्या पडलेल्या वाशिमला मोठी कनेक्टिव्हीटी मिळाली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक नाकर्ते सरकार आपल्याला अडीच वर्ष पहायला मिळाले. संत सेवालाल महाराजांच्या पोहरादेवीला आम्ही आमच्या काळात निधी दिला. पण, महाविकास आघाडीने अजीबात निधी दिला नाही. आता आपण पुन्हा अर्थसंकल्पात निधी मंजूर केला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
मागेल त्याला शेततळेच नाही तर…
शेतकर्यांना एनडीआरएफच्या दुप्पट निधी आणि 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने आतापर्यंत 12,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. येणार्या काळात सुद्धा शेतकर्यांना मदत व्हावी, म्हणून सततचा पाऊस हा नवा निकष तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठी मदत मिळणार आहे. शेतकरी सन्मान योजनेत 6000 रुपये केंद्र सरकारचे आणि आता त्यात 6000 रुपये राज्य सरकारची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील आपत्तीग्रस्त भागात अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय, केवळ 1 रुपयांत पीकविमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आता राज्य सरकारतर्फे राबविली जाणार आणि त्यातील मदत 2 लाख रुपये करण्यात आली. मागेल त्याला शेततळेच नाही तर त्यात फळबाग, ठिबक सिंचन, शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर इत्यादींची भर आता घालण्यात आली, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
…म्हणून आवास योजना सुरु
गरिबाला घर मिळाले पाहिजे, म्हणून मोदी आवास योजना सुरू केली. त्यात 3 वर्षांत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यातील 3 लाख घरे यावर्षी बांधण्यात येतील. गावांत रस्ते बांधण्याचा कार्यक्रम प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहेत. त्यासाठी 4000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. एसटीमध्ये 50 टक्के सूट देण्यात आली. ‘लाडली लेक योजने’च्या माध्यमातून कन्येचा सन्मान करण्यात येणार आहे.
घरी जन्माला येणारी मुलगी ही जन्मत:च लखपती राहणार आहे. शेतकर्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येत आहे. शेतकरी जे जागा किरायाने देतील, त्यांना एकरी 50 हजार रुपये आणि वार्षिक तीन टक्के वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिसोड तालुक्यात बॅरेज, मालेगावची पाणी समस्या, वाढीव पाणीपुरवठा योजना, 25 कोटी रुपयांची कामे रिसोडमध्ये केली जातील, असे त्यांनी सांगितले.