नागपुरात भाजपाची काँग्रेस होते आहे का?, विधान परिषदेतील पराभवानंतर फडणवीसांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

नागपुरात भाजपाची काँग्रेस होते आहे का, अशी चिंता व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहे. काँग्रेसप्रमाणे (Congress) भाजपातही कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त होत आहेत का, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

    नागपूर : नागपुरात भाजपाची काँग्रेस होते आहे का, अशी चिंता व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहे. काँग्रेसप्रमाणे (Congress) भाजपातही कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त होत आहेत का, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) भाजपाच्या झालेल्या पराभवानंतर झालेल्या नागपूर भाजपाच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. अनेक माजी नगरसेवकांना आजी नगरसेवक व्हायची इच्छा आहे, हे आपल्याला माहित आहे, असं फडणवीस म्हणाले. मात्र, आपण राज्याचे गृहमंत्री आहोत, कोण काय काय करतंय हे आपल्याला चांगलं माहित आहे, असं सांगत त्यांनी काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.

    काय म्हणाले फडणवीस?

    या शहर भाजपाच्या कार्यकारिणीत फडणवीस भाषणात म्हणाले की, आता हवा आहे, मोदीजींचं नाव आहे, त्यांचं काम आहे. राज्यात सरकार आहे. आत्ता मतं मिळतील पण हळूहळू कमी होत जातील. काँग्रेस पक्षाचा ऱ्हास असाच झाला. काँग्रेस पक्ष नेत्यांचा आणि कागदावरचा पक्ष झाला. मला भीती आहे की नागपूर शहर भाजपा हा नेत्यांचा पक्ष होतोय आणि कागदावरचा पक्ष होतोयय अजून इतकी वाईट स्थिती नाहीये. मात्र, ही सध्याची स्थिती बदलली नाही तरी आपल्याला सांगितलेली स्थिती पाहायला मिळणार आहे. नम्रतेनं सांगतो की मी गृहमंत्री आहे, कोण काय करतंय याचा फिडबॅक माझ्याकडे असतो. आपल्याला आपली कार्यपद्धती बदलावी लागेल. आपल्याकडे अनेक माजी नगरसेवक आहेत, त्यांना आजी व्हायचंय. पण त्यातल्या अनेकांचा फिडबॅक असा आहे की ते आजी होऊ शकणार नाहीत. आपल्याला काही कुणाची तिकिटं वगैरे कापायची नाहीत. पण आपण मालक आहोत अशा प्रकारे वागणं हे योग्य नाही. आणि काही माणसं नेत्यांची माणसं आहेत. पक्षाशी देणंघणं नाही. आपला सवतासुभा आहे. असं कसं चालेल. शेवटी पक्ष आहोत म्हणून आपण आहोत. आपल्याकडं मतं कुणाची आहे. ठिक आहे ७५ टक्के मतं ही पक्षाची आहेत ना, अशा स्थितीत आजचं जे चित्र आहे ते बदलण्याची आवश्यकता आहे.

    विधान परिषद पराभव फडणवीसांच्या जिव्हारी

    नागपूर आणि अमरावती शिक्षक-पदवीधर निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ही बैठक झाली. येत्या काळात नागपूर महापालिका निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचल्याचं मानण्यात येतंय. एकाअर्थी फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना तंबीच दिलेली आहे. नागपूर महापालिकेत १२० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं टार्गेट भाजपाकडून ठेवण्यात आलं आहे. यासाठी वागणूक बदलण्याची गरज फडणवीसांनी व्यक्त केली आहे.