
विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा सिसेमिरा लावला जात आहे. मात्र, हेच नेते जेव्हा भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांच्याविरोधातील चौकशी थांबवली जाते. त्यांना क्लीनचिट दिली जाते, असं या पत्रात म्हटलं आहे.
मुंबई : देशात जेव्हापासून भाजप (BJP) सत्तेत आला आहे. म्हणजे 2014 सालापासून केंद्रीय तपास यंत्रणा अधिक प्रमाणात सक्रीय झाल्या आहेत. ईडी, आयकर विभाग, एनआयए (ED, IT, NIA) आदी केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त विरोधकांच्या मागे लावल्या जात आहेत, भाजपमधील किंवा सत्तेतील लोकांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा का नाहीत? असा सवाल करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र (PM Narendra Modi) लिहिले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले.
पंतप्रधान मोदींना पत्र विरोधकांनी लिहिल्यावर त्यावर फडणवीस यांनी सांगितले की, ‘मोदींच्या राज्यात ज्यांनी गैरमार्गाने पैसे कमावलेले आहेत, गैरकारभार-भ्रष्टाचार करत आहेत अशांना शिक्षा देण्याचं काम या यंत्रणा करत आहेत. यंत्रणांचा गैरवापर कुठेही होत नाही. त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. त्यामुळे असं कोणतंही पत्र लिहून यातून कुणाचीही सुटका होईल, असं मला वाटत नाही. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे हा भ्रष्टाचार त्यांनी बंद करावा, असे ते म्हणाले.
विरोधकांनी आरोप करत म्हटले की, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या असं एखादं उदाहरण आरोप करणाऱ्यांनी दाखवावं. कुणाचीही चौकशी बंद होत नाही. भाजपमध्ये असो किंवा कुठेही असो, ज्याने चूक केली त्याची चौकशी होणार आहे. एखाद्यावर चुकीची कारवाई झाली असेल, तर न्यायालय आहे. न्यायालय निश्चितपणे न्याय देईल.
पत्रात विविध मुद्यांवरून टीका
विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा सिसेमिरा लावला जात आहे. मात्र, हेच नेते जेव्हा भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांच्याविरोधातील चौकशी थांबवली जाते. त्यांना क्लीनचिट दिली जाते, असं या पत्रात म्हटलं आहे. या पत्रातून आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्यावरही टीका करण्यात आली आहे. या पत्रात राज्यपालांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.