प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! गेट वे ते बेलापूर दरम्यान ‘ई-वॉटर टॅक्सी’ डिसेंबरपासून सुरू होणार

    मुंबई : गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर दरम्यान समुद्रातुन प्रवास करण्याचा आता प्रवाशांना आंनद लुटता येणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर मार्गावर विद्युत अर्थात ‘इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी’ सुरू(Belapur To Gate Way Of India Water Taxi) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या डिसेंबरपासून प्रवाशांना या वॅाटर टॅक्सीतून प्रवास करता येणार आहे. यासाठी गोव्यात चार बोटींची बांधणी करण्यात येत असून त्यापैकी दोन बोटी डिसेंबरपासून सेवेत दाखल होणार आहेत. महत्त्वाच म्हणजे  गेट ऑफ इंडिया ते बेलापूर  अंतर केवळ एका तासात पार करता येईल. या प्रवासासाठी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जाणार आहे.

    मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेक वर्षापासून जैसे थे आहे. नवी मुंबईतुन मुंबईत जाण्यासाठी बराच वेळ लागतो. त्याच वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो. यावर तोडगा काढण्यसाठी जलवाहतुकीच पर्यायी मार्ग म्हणून विचार करण्यात येत आहे.  मुंबई सागरी मंडळ, मुंबई बंदर प्राधिकरणाकडुन या जलवाहतुकीला चालना देण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत आहे.त्याचाच भाग म्हणून ‘रो रो’ सेवा आणि ‘वॉटर टॅक्सी’ सेवा सुरू करण्यात येत आहेत. एका खासगी कंपनीच्या माध्यमातून दीड-दोन वर्षांपूर्वी गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर, मांडवा अशी २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रतिसादाअभावी ती बंद पडली होती. असे असताना आता गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेट वे ऑफ इंडिया ते बेलापूर अशी विद्युत अर्थात इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.