‘विधानसभेपूर्वी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार’; भाजप खासदार अशोक चव्हाण यांचं मोठं विधान

काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वावर हल्लाबोल केला.

    नांदेड : काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण (BJP MP Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्षातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वावर हल्लाबोल केला.

    तसेच, लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसतील, असे सूतोवाचही त्यांनी केले. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठे राजकीय भूकंप होतील. बरेच नेते मोठा निर्णय घेतील, सगळे मोठे नेते सोडून जात आहेत, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

    चव्हाण पुढे म्हणाले, भाजपात मला पूर्ण मानसन्मान मिळत असून, पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली, ती मी चोखपणे पूर्ण करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा माझा हात धरत लोकांना अभिवादन केले. तो क्षण माझ्यासाठी अमूल्य होता. देशात मोदी सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, ज्या पक्षाचे भविष्य नाही, त्या पक्षात आपले भविष्य काय असणार. जिंकण्याची जिद्द नाही, पक्ष पुढे नेण्याची पक्ष नेतृत्वालाच इच्छा नाही. तिथे थांबून मी करणार काय, असा सवाल करत अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे कारण सांगितले.

    याशिवाय, काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीसाठी विद्यमान नेतृत्वच जबाबदार आहे. नाना पटोलेंसारखे थोर विद्वान जर पक्ष चालवत असतील तर त्या पक्षाचे काय होणार, असा प्रश्नही चव्हाणांनी उपस्थित केला.