पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के,रिश्टर स्केलवर 3.6 तीव्रता

पालघरमधील डहाणू, तलासरी तालुक्यात भुंकपाचे धक्के जाणवले. 3.6 रिश्टर स्केलचे हे भुंकपाचे धक्के होते.

    पालघर  : पालघरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पालघरमध्ये पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के जाणवले. पालघर जिल्ह्यातील डहाणू (Dahanu), तलासरी (Talasari) तालुक्यात हे भूकंपाचे धक्के (Earthquake News) जाणवले. रिश्टर स्केलवर 3.6  इतकी  भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली. यामुळे परिसरात भितीचं वातावरण आहे.

    पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवला आहे. डहाणू, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी या परिसरात 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा धक्के जाणवले. दरम्यान, पालघर जिल्ह्याच्या डहाणू तलासरी भागात मागील तीन वर्षांपासून लहान मोठ्या भूकंपाच्या हादऱ्यांचे सत्र सुरूच असून हे हादरे मागील सात महिन्यांपासून बंद झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा भूकंप जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवानं आजपर्यंत या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवित हानी झाली नसली तरी सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे या परिसरातील घरांना तडे गेले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.