रवींद्र वायकरांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स; 23 ऑक्टोबरला पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश

हॉटेलच्या ५०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्या अडचणी वाढणार आहेत. ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावलं असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

    मुंबई : ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. दरम्यान, त्यासाठी रवींद्र वायकर यांना 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आलेत. 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांना हे समन्स बजावण्यात आले. दरम्यान, रवींद्र वायकर यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना आपल्याला अशा कोणत्याही प्रकारचं समन्स आले नसल्याचे म्हटले आहे. तसेच, जर कोणतीही समन्स आलं तरी चौकशीला हजर राहणार असल्याचं देखील रवींद्र वायकर म्हणाले.
    रवींद्र वायकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल
    जोगेश्वरी भूखंड आणि पंचतारांकित हॉटेलप्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये रवींद्र वायकर यांनी आधीच कोर्टाकडून अटकपूर्व जामीन घेतला आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी देखील काही आरोपी आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप
    ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं आहे. 23 तारखेला सकाळी 11 वाजता त्यांना पोलीस मुख्यालयात बोलवलं आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सप्टेंबरच्या महिन्यात रविंद्र वायकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.