अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? परबांच्या ‘या’ निकटवर्तीयांना ईडीकडून समन्स

कोरोनाकाळात आमदार अनिल परब यांनी दापोलीत साई रिसॉर्टचे अनाधिकृत बांधकाम केले आहे. तसेच येथे मनी लॉन्डिगचा पैसा वळविण्यात आला असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच याविरोधात भा.द.वि. ४२० नुसार अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्याविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

    रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार व नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय व जवळचे मित्र सदानंद कदम (Sadanand kadam) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स पाठवला आहे, ईडीने काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्ट (Sai Resort) बांधताना पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदानंद कदम यांनी बाजाराभावातील कमी किंमतीपेक्षा हे रिसॉर्ट विकल्याचा ठपका ईडीने (ED) ठेवला असून, या कारणामुळं ईडीनं सदानंद कदम यांना समन्स जारी केला आहे. त्यामुळं आमदार अनिल परब यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, कोरोनाकाळात आमदार अनिल परब यांनी दापोलीत साई रिसॉर्टचे अनाधिकृत बांधकाम केले आहे. तसेच येथे मनी लॉन्डिगचा पैसा वळविण्यात आला असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. तसेच याविरोधात भा.द.वि. ४२० नुसार अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायत तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांच्याविरोधात दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने अनिल परब यांचे जवळचे मित्र सदानंद कदम यांना समन्स पाठवला आहे.

    रिसॉर्टच्या बांधकाम प्रकरणी काही दिवसांपूर्वी नगर नियोजन कायद्यांतर्गत कदम यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला गेला होता. तसेच मे महिन्यात ईडीने अनिल परब व सदानंद कदम यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. याशिवाय पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारने CRZ मध्ये बांधकाम केल्याप्रकरणी कोर्टात तक्रार दाखल केली होती. तो वेगळा खटला दापोली न्यायालयात सुरू आहे. दरम्यान, ईडीनं सदानंद कदम यांना समन्स जारी केल्यामुळं त्यांना चौकशीला सामोरी जावे लागणार असून, त्याचबरोबर येत्या 14 डिसेंबर रोजी अनिल परब यांना देखील चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.