
बिशप पी. सी. सिंह यांच्यावर मिशनद्वारे चालवण्यात येत असलेल्या शाळांच्या फिमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचं कार्यालय नागपूरच्या सदर भागात आहे.
नागपूर: नागपुरात (Nagpur) गेल्या काही दिवसांपासून ईडीची छापेमारी सुरु आहे. आजही नागपुरात सदर भागात चर्चच्या कार्यालयावर धाड टाकण्यात आली.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही छापेमारी (Nagpur ED Raid) करण्यात आली. देशभरात चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या 11 कार्यालयांवर छापा टाकण्यात आला. नागपुरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी ऑफिसची 10 तास झाडाझडती घेतली. या कारवाईमध्ये ईडीच्या हाती अनेक महत्त्वाची कागदपत्रे लागली असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईमुळे चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या (Church Of North India) नेटवर्कमध्ये खळबळ उडाली आहे.
बिशप पी. सी. सिंह यांच्यावर मिशनद्वारे चालवण्यात येत असलेल्या शाळांच्या फिमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचं कार्यालय नागपूरच्या सदर भागात आहे. त्यांच्या मिशनतर्फे शाळांमध्ये फि आकारली जाते. या फिच्या म्हणजेच शुल्काच्या रकमेमध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
नक्की घडलं काय?
बिशप पी. सी. सिंह यांच्या कार्यकाळात अनेक गोष्टींवरून वाद निर्माण झाला आहे. चर्च ऑफ नॉर्थ इंडिया अंतर्गत अनेक गैरप्रकार केले गेल्याची माहिती मिळाली आहे. संस्थेच्या जमिनी आणि इतर आर्थिक गोष्टींमध्येही गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बिशप सिंह याला नागपूर विमानतळाहून अटक करण्यात आली होती. मध्यप्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीनं ही अटक करण्यात आली. ईडीने फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता ही कारवाई करण्यात आली आहे.
धार्मिक स्थळांवर २ कोटीपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर
मध्य प्रदेश पोलिसांना बिशपच्या घरून साधारण 1.6 कोटी रुपये मिळाले होते. त्यावेळी बिशप जर्मनीमध्ये होता. 2004-05 आणि 2011-12 या वर्षात वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांकडून फि वसूल करण्यात आली होती. धार्मिक स्थळांवर 2 कोटीपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.