kagal hasan mushrif supporters

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर तिसऱ्यांदा ईडीकडून कारवाई करण्यात येत असल्यानं मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कागलमध्ये मुश्रीफ यांच्या घराबाहेर समर्थकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. मुश्रीफ यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे.

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कोल्हापुरातील (Kolhapur ED Raid) घरावर ईडीनं तिसऱ्यांदा छापेमारी केली आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या 40 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी छापेमारी आणि चौकशी सुरु आहे. कोल्हापूर आणि पुण्यात ही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. त्याबरोबरच कोल्हापूर जिल्हा बँकेत गैरव्यवहार प्रकरणीही कारवाई करण्यात येते आहे. त्यांच्या घरासह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतरही काही शाखांवर छापेमारीची कारवाई करण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.

मुश्रीफ यांच्या घरावर तिसऱ्यांदा ईडीकडून कारवाई करण्यात येत असल्यानं मुश्रीफ यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कागलमध्ये मुश्रीफ यांच्या घराबाहेर समर्थकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली आहे. मुश्रीफ यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येत असल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान या प्रकरणात आम्हाला फासावर लटकवा, म्हणजे तुमचं समाधान होईल, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांच्या पत्नीनं दिली आहे. तर महाविकास आघाडीचे नेते जाहीरपणे हसन मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ उतरलेले दिसतायेत. मुश्रीफ यांच्या घराबाहेर समर्थक आणि पोलिसांत बाचाबाची झाली.

हा तर बदला घेण्याचा प्रयत्न – सुप्रिया सुळे
बदला घेण्यासाठी ईडी आणि सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतो आहे. या महत्त्वाच्या संस्था आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या यंत्रणा स्वायत्त होत्या. मात्र आता त्यांचा उपयोग दडपशाहीसाठी होत आहे. त्यांचा वापर सामान्य माणूस आणि विरोधकांविरोधात होत असेल तर ते संविधानाच्या चौकटीचं उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

मुश्रीफांवरील कारवाईचा निषेध- राऊत
काही कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार आहे, त्यातही चौकशी करणार का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. महाराष्ट्रात मविआ गतीनं पुढे जाते आहे. कसबा निकालानंतर जे वातावरण निर्माण झालं आहे. त्याला खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे. या ईडीच्या कारवाया बोगस, भंपक आणि खोट्या आहेत. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक, सदानंद कदम या सगळ्या प्रकरणात काहीही निघालेलं नाही. जे जे विरोधात बोलोतायेत त्यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयचा वापर सुरु आहे.

भ्रष्टाचार केला तर कारवाई तर होणारच- सोमय्या
निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेतलं तर म्हणतात की, निवडणूक आयोगानं 2 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. राऊतांवर ईडीने कारवाई केली तर ती राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं सांगतात. मुश्रीफ यांनी कोर्टात आणि आयकर विभागासमोर 148 कोटींचा गैरव्यवहार केल्याची कबुली दिली आहे. त्या ठिकाणी सेटलमेंट करण्याची त्यांची तयारी होती. सोमय्या काय म्हणतोय, यंत्रणा काय करतायेत, यात तुम्ही भ्रष्टाचार केलात, त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावाच लागेल. रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्यांबाबत संजय राऊत का बोलत नाहीत, असा सवाल किरिट सोमय्या यांनी केलाय.

मुश्रीफ ईडीच्या रडारवर
1. संताजी घोरपडे साखर कारखान्यात 40 कोटींचा गैरव्यवहार
2. गैरव्यवहार केल्याचा किरिट सोमय्या यांचा मुश्रीफांवर आरोप
2. 11 जानेवारी रोजी ईडीकडून कोल्हापुरात छापेमारी
3. त्यानंतर महिनाभरात मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर काही शाखआंवर छापेमारी
4. 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मुश्रीफांविरोधात गुन्हा
5. मुरगूड पोलीस ठाण्यातही मुश्रीफांविरोधात फसवणुकीचा गुन्हा
6. हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ मुंबई हायकोर्टात