
कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये झालेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना चौकशीसाठी समन्स जारी केले आहे.
मुंबई : कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये झालेल्या जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. दिलीप ढोले यांना ईडीचे समन्स जारी झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ढोले यांची पालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ढोले यांच्या बदलीनंतर त्यांची कुठेही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील काही बिल्डरांची जमीन ही कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरत होती. त्यामुळे ती सरकारदरबारी जमा करणे अनिवार्य होते. मात्र, बिल्डर लॉबीने सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून या जमिनी निवासी क्षेत्राऐवजी ग्रीन झोनमध्ये येतात, अशी बनावट कागदपत्रे तयार केली होती. निवासी क्षेत्राऐवजी जमीन जर ग्रीन झोनमध्ये मोडत असेल तर अशी अतिरिक्त जमीन सरकारला द्यावी केली होती. लागत नाही. त्यामुळे जमीन ग्रीन झोनमध्ये बदलून घेण्याचा घोटाळा या लोकांनी केला होता.
प्रकरणाचा प्रवास……
ठाण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करत काही लोकांना अटकही केली होती. मात्र, त्यांनी निष्पक्ष चौकशी केली नाही व काही बिल्डरांवर कृपादृष्टी दाखवल्याचा आरोप करत बिल्डर राजू शहा यांनी आघाडी सरकारकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने एका एसआयटीची स्थापना केली होती. यानंतर नगर नियोजनकार व काही वास्तुविशारदांना अटक झाली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणी पुढे फारसे काही घडले नव्हते.