कोल्हापूरमध्ये ईडीचे पथक दाखल; आमदार हसन मुश्रीफांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी

हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेली कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी (ED) छापेमारी केली आहे. तसेच कागलमधील काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले असून तिथे देखील चौकशी करणार आहेत.

    कोल्हापूर– आज एकिकडे देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकीय क्षेत्रातून सकाळी एक मोठी घडामोड व महत्त्वाची बातमी समोर आलीय. माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेली कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी (ED) छापेमारी केली आहे. तसेच कागलमधील काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले असून तिथे देखील चौकशी करणार आहेत. याआधी दोन वेळा ईडी आणि आयकर विभागाने (Income Tax) हसन मुश्रीफांच्या घरांवर व कार्यालयावर छापेमारी केली आहे.

    तिसऱ्यांदा छापेमारी…
    दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस नेते हसन मुश्रीफ यांच्या जिल्हा बँकवरील ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. 11 जानेवारी रोजी आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली होती. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासणे मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला होता.

    नेमकं काय आहे प्रकरण?
    आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या काही कंपन्यांची चौकशी ईडी करत आहे. त्या कंपन्यांचे कनेक्शन हसन मुश्रीफ आणि त्यांच्या संबंधित असलेल्या साखर कारखान्यांशी जोडलं जात आहे. रजत प्रायव्हेट लिमिटेड, माऊंट कॅपिटल लिमिटेड या दोन्ही कंपन्या बंद पडल्या आहेत. जवळपास 15 वर्षापूर्वी या कंपन्या बंद पडल्या होत्या. या कंपन्यांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी 50 कोटी रुपयांची रक्कम भरल्याची माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे. 15 वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीच्या खात्यात 50 कोटी कॅश भरले होते. ते पैसे साखर कारखान्याच्या (Sugar Factory) खात्यात वळवले होते. तसेच कोलकात्यातील (Kolkata) काही शेल कंपन्यांचा वापर करुन काळा पैसा आपल्या खात्यात वळल्याचा आरोप ईडीने केला आहे.

    काय आहे कोल्हापुरात मुश्रीफांचं राजकीय महत्त्व?
    राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व आमदार हसन मुश्रीफ हे पक्षातील मोठे व पहिल्या फळीतील नेते आहेत, मुश्रीफ हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. आपल्या प्रभावी कामांमुळं कागल या मतदारसंघात मागील पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील ओबीसी समाजाचा मोठा चेहरा तसेच मुस्लीम समाजातील विश्वासू चेहरा म्हणून मुश्रीफ यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळं कोल्हापूरच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे. आपल्या कामांमुळं मतदारांची विश्वासार्हता व मने दोन्ही त्यांनी जिंकली आहे. कागल या मतदारसंघात मुश्रीफ यांना देव मानले जाते. कारण मुश्रीफ यांनी तळागळातील लोकांची कामे केली आहेत. 2014 साली जेव्हा मोदी लाट होती, तेव्हा सुद्धा मुश्रीफ कागल मतदारसंघात जिंकून आले होते. त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांचे विशेष राजकीय महत्व असल्याचं बोललं जातंय.