hasan mushrif

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा बँकेची (Kolhapur District Bank) ईडीकडून (ED) झाडाझडती सुरु आहे. ईडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहेत.

    कोल्हापूर : महाराष्ट्रात एकीकडे विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना (MLC Election Result)कोल्हापुरातून (Kolhapur) एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा बँकेची (Kolhapur District Bank) ईडीकडून (ED) झाडाझडती सुरु आहे. ईडीने जिल्हा बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासाठी हा धक्का मानला जातोय. ईडीकडून काल हसन मुश्रीफ यांच्या बँक खात्याशी संबंधित चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून जिल्हा बँकेत दोनदा धाड टाकण्यात आली. ईडीकडून आजही बँक कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. ईडीने आज जिल्हा बँकेच्या पाच कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं.

    ईडी अधिकाऱ्यांच्या या कारवाईवर एका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की, “आम्ही सांगितलं उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या चौकशीसाठी कर्मचारी उपस्थित राहतील. मानवतावादी दृष्टीकोनातून तुम्ही या कर्मचाऱ्यांना घरी जायला, विश्राम करायला परवानगी द्या. हे कर्मचारी उद्या चौकशीसाठी हजर राहतील. ईडीचे अधिकारी म्हणाले, समन्स आले आहेत. त्यांनी आज हजर झालं पाहिजे. हा नियम आहे. आम्ही त्यांना सांगितलं, साहेब समन्स पाठवलेलं बदलता येतं. परत पाठवा आणि दुरुस्ती करुन आणा. पण हे सुद्धा ऐकायची त्यांची तयारी नाही”.

    ईडीला सगळे कर्मचारी चौकशीसाठी सहकार्य करत आहेत. दरम्यान जे कर्मचारी चौकशीसाठी मुंबईला जात आहेत ते ताणतणावात आहेत. या कर्मचाऱ्यांना कुठलाही धोका निर्माण झाला तर संबंधित अधिकाऱ्यांवर खटला दाखल केल्याशिवाय संघटना थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा काही कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

    काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील राहत्या घरी ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती. ईडी अधिकाऱ्यांनी त्यादिवशी तब्बल अकरा तास मुश्रीफांच्या कुटुंबियांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. ईडी अधिकारी त्यावेळी काही महत्त्वाची कागदपत्रे घरातून घेऊन गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली आहे.