पन्हाळा तालुक्यातील शिक्षण  क्षेत्रात खळबळ ; संभाजी बिग्रेडने प्रकरणाला फोडली वाचा

पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकाकडून चौथीच्या वर्गातील मुलींशी असभ्य, लैगिक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  राम करले, बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकाकडून चौथीच्या वर्गातील मुलींशी असभ्य, लैगिक वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर मुली शाळेत जात नसल्याच्या कारणातून पालकांनी सखोल चौकशी केली असता शिक्षकाच्या वर्तवणूकीची गंभीर बाब समोर आली. नामदेव मारूती पोवार असे संशयित शिक्षकाचे नाव आहे. संभाजी बिग्रेडने या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर झोपलेले शिक्षण प्रशासन अॅक्टिव्ह  झाले. दरम्यान या गंभीर  प्रकारामुळे पन्हाळा शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

  पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गाला शिकविणारा शिक्षक नामदेव पोवार या संशयिताने लहान मुलींशी असभ्य, लैंगिक वर्तन केले असल्याची बाब पुढे आली. दिवाळीच्या सुट्टीनंतर काही मुली शाळेला जाणार नसल्याच्या पवित्र्यांमुळे पालकांच्यामध्ये संशय व्यक्त होऊ लागल्याने. याविषयी मुलींच्याकडे चौकशी केली असता नामदेव पोवार हा नराधम शिक्षक आपल्याशी असभ्य लैगिक वर्तन करत असल्याचा मुलींनी पालकांसमोर पाढा वाचल्याने सर्वांना हादराच बसला.

  या घटनेची गावात दबक्या आवाजात चर्चा होती;परंतू घटनेबाबत आवाज उठविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने ग्रामपंचायतीने पन्हाळा पोलिस ठाणे, गटविकास अधिकारी आणि तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याशी पत्र व्यवहार करून नामेदव पोवार या शिक्षकाचे वर्गातील मुलींशी असभ्य लैगिक वर्तन वारंवार घडत आहे. गावात त्या शिक्षकांबाबत उद्रेक होऊ अघटीत घटना होण्यापूर्वी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने पत्राद्वारे मंगळवारी केली होती.  मात्र संबंधित तिन्ही विभागाने प्रकरण गांभिर्याने न घेता दुर्लक्षित केले. गेल्या चार दिवसात त्या शिक्षकांवर काही कारवाई झाली नसल्याने गैरवर्तन करणारा शिक्षक मोकाट असल्याने परिसरात संताप व्यक्त होत होता. त्यानंतर पोवार याने पंधरा दिवसाच्या रजेचा अर्ज मुख्याध्यापकाकडे पाठवून फोन स्विच आँफ करून ठेवला आहे.

  ग्रामपंचायतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतर संभाजी बिग्रेडचे उत्तर जिल्हा अध्यक्ष संदिप यादव तसेच निलेश सुतार,संतोष खोत यांनी मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाला शनिवारी वाचा फोडली. त्यानंतर मात्र झोपलेले प्रशासन जागे झाले.  या घडलेल्या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात येताच शनिवारी सायंकाळी पन्हाळा पोलीस अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशीला सुरूवात केली.

   मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करा
  शाळेत मुख्याध्यापक हा प्रशासन प्रमुख असतो. शाळेतील सर्व प्रकारावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी त्यांची असते. मात्र  संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना हा प्रकार समजला होता. त्यांनी कर्तव्याला जागून तातडीने वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी पुढे येणे गरजेचे होते. उलट आपल्याला हा प्रकार माहित नाही. असा कांगावा करणेचा प्रयत्न संबंधित मुख्याध्यापकांने केल्याची चर्चा असून प्रकरण दडपण्यासाठी ताकद लावलेचे समजते. शाळेतील गंभीर प्रकार मुख्याध्यापकांना माहित नसेल तर कर्तव्यात कसुर केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण यांनी तातडीने संबधित मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

  शिक्षक संघटना गप्प का ?
  ‘त्या’ शिक्षकांची असभ्य वर्तणुक समोर येवून देखील शिक्षक संघटना गप्प का? असा प्रश्न उपस्थित  केला जात आहे. प्रकरणाची  सखोल चौकशी करुन संशयितावर बडतर्फीची कारवाई करावी. यासाठी शिक्षक संघटनांनी लेखी निवदने प्रशासनाला देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

  विद्यार्थ्यांर्थीनींशी असभ्य वर्तन करणाऱ्या त्या शिक्षकावर तातडीने बडतर्फची कारवाई करावी. अन्यथा प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडू.

  -संदिप यादव, उ.जिल्हा, अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड

  शिक्षकी पेशाला काळमी फासणारी घटना ‘त्या’ शिक्षकाचे कृत्य शिक्षकी पेशाला काळमी फासणारी घटना आहे. त्यांच्या वर्तवणुकीबाबत वरिष्ठ प्रशासनाला ग्रामपचायतीच्यावतीने लेखी तक्रार केली आहे. परंतु प्रशासनाने गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्याच्यावर कडक कारवाई करावी. अन्यथा सोमवारी (दि.२१) रोजी शाळेला टाळे ठोकू.

  -शहाजी खुडे, उपसरपंच, पोर्ले तर्फ ठाणे