कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नशिबी अश्रूच; लाखोंचा खर्च अन् किलोला १ रुपये भाव; वाचा कर्जबाजारी शेतकऱ्याची व्यथा

  Effect of Onion Export Ban : कांद्याचा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. केंद्राच्या निर्यादबंदीने कांद्याचे दर बाजारात पडलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दल खर्चदेखील निघत नाही. अशीच परिस्थिती बीडमधील एका शेतकऱ्याच्या नशिबी आलेली पाहायला मिळाली आहे. केंद्राने  कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे दर झपाट्याने खाली आहेत. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

  दोन एकरमध्ये कांदा पिकाची लागवड

  त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने कांदा बांधावर फेकून दिला असून शेतात अक्षरशः कांद्याचा सडा पडला आहे. वैभव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते नेकनूर गावातील रहिवासी आहे. वैभव यांच्याकडे ७ एकर शेती असून, यामध्ये त्यांनी दोन एकरमध्ये कांदा पिकाची लागवड केली होती. यासाठी त्यांना ७० हजार रुपये खर्च आला. उसनवार यांनी कर्ज घेऊन लावलेल्या कांद्याला चांगला भाव मिळेल आणि आपली आर्थिक घडी बसेल. असे स्वप्न वैभव शिंदे यांनी उराशी बाळगलं होतं. मात्र, जेव्हा सोलापूरच्या मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी नेला, तेव्हा त्याला कवडी मोल भाव मिळाला.

  प्रतिकिलो १ रुपया कांद्याला भाव

  बीडमधील वैभव शिंदे यांनी मोठ्या हिमतीने आणि उराशी चांगले स्वप्न बाळगून कांद्याची लागवड केली होती. परंतु, बाजारात कांदा घेऊन गेल्यानंतर कांद्याला मिळालेल्या दराने वैभव हे पुरते नाराज झाले, कारण केलेला खर्चदेखील निघणार नव्हता. वैभव यांचा कांद्याला प्रतिकिलो १ रुपया इतकांच भाव मिळाला. यामुळं त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. उलट ५५८ रुपये तेथील आडत दुकानदाराला देण्याची वेळ वैभव शिंदे यांच्यावर आली. कांदा तर गेलाच मात्र एवढी मेहनत घेऊन आडत दुकानदाराला देखील पैसे द्यावे लागले.

  त्याचं कांद्याने डोळ्यात पाणी आणलं

  यामुळे वैभव शिंदे यांनी उर्वरित कांदा आपल्या शेतात आणि शेताच्या बांधावर फेकून दिला. याविषयी तरुण शेतकरी वैभव शिंदे म्हणाले, की “आम्ही दोन एकरात कांदे लावले होते. त्यासाठी मोठा खर्च आला होता. या कांद्यावर कुटुंबाची गुजरात होईन, असं वाटलं होतं. मात्र त्याचं कांद्याने डोळ्यात पाणी आणलं. आज कांद्याला भाव मिळाला नाही”.

  मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या
  सततची नापिकी, अतिवृष्टी, दुष्काळ असे नैसर्गिक संकट हे पाचवीला पुजलेले असताना आपल्या मेहनतीच्या जोरावर शेतकरी पीक घेतो. मात्र, त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभा ठाकत आहे. परिणामी बीड जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत तब्बल २७८ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.