शिंपल्यांची कच वाहतुक करणारा आयशर टेंपो राजापूर पोलिसांच्या ताब्यात

सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान राजापूर पोलिसांनी एमएच ०९, एफएल ५११० या क्रमांकाचा आयशर टेम्पो पकडला. मिळालेल्या माहितीनुसार त्या आयशर टेम्पोमधून शिंपल्याच्या कचची वाहतुक सुरु होती.

    राजापूर (Rajapur) पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावरून जात असलेला एक आयशर टेम्पो पकडला. मिळालेल्या माहितीनुसार त्या टेम्पोमध्ये शिंपल्याच्या कचचा (Mussels raw) काही साठा सापडला आहे. सदर प्रकरणी राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन संबंधितांना येथील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र याविषयी माहिती देण्यास राजापूर पोलीस टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्याने शंका कुशंकानी जोर धरला आहे.

    सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान राजापूर पोलिसांनी एमएच ०९, एफएल ५११० या क्रमांकाचा आयशर टेम्पो पकडला. मिळालेल्या माहितीनुसार त्या आयशर टेम्पोमधून शिंपल्याच्या कचची वाहतुक सुरु होती. त्याच्या रॉयल्टीचा परवाना घेण्यात आला होता का नाही त्याबाबतची माहिती समजू शकली नाही. दरम्यान पोलिसांनी पकडलेला टेम्पो राजापूर पोलीस ठाण्यात आणला आणि नंतर संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वाहतूक करणाऱ्याना न्यायालयात हजर करण्यात आले होते. याबाबत अधिक तपशील उपलब्ध झाला नव्हता. राजापूर तालुक्यात अणसुरे परीसरात दोघांना शिंपल्याची कच काढण्याचा परवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी एकाला शंभर ब्रास तर दुसऱ्याला दोनशे ब्रासची परवानगी देण्यात आली होती. संबंधीत गाडीचे कागदपत्रे होती का? रॉयल्टी चुकविण्यात आली होती का याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही.

    राजापूर तालुक्याच्या खाडी पट्ट्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणावर शिंपल्याच्या कचचे उत्खनन होत असते. नाममात्र रॉयल्टी शासनाकडे भरायची आणि शासनाची दिशाभुल करायची असे उद्योग सुरु असुन अशा व्यवस्थापनाला राजकीय वरदहस्त मिळत असल्याने ते फोफावलेत असेही आरोप अधुन मधुन केले जात असतात. राजापूर पोलिसांनी पकडलेल्या आयशरमधील शिंपल्यांच्या कचबाबत कोणती माहिती मिळते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पकडण्यात आलेला टेम्पो हा परजिल्ह्यातील असल्याचे समजते.