नारायणगावात आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले ; बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून कारवाई

नारायणगाव भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पकडले. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा नोंद केला आहे. एटीएसकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

  पुणे : नारायणगाव भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी पकडले. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा नोंद केला आहे. एटीएसकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

  पुण्यात रोजगारानिमित्ताने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासोबतच पुण्यातील बुधवार पेठेत देखील अनेक मुलींना आणले जात असल्याचे वास्तव आहे. नुकतीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने येथे कारवाईकरून काही महिला व मुलींची सुटका केली होती. दरम्यान, यामध्ये बांगलादेशी नागरिक देखील येत असून, ते बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. भारतात आल्यानंतर त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे तयार केली जात आहे. यामुळे तपास यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, नारायणगाव परिसरात बेकयादा काही बांगलादेशी नागरिक राहत असून, ते मोलमजूरी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसच्या पथकाने गुरुवारी आठ बांगलादेशी नागरिकांना नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले.

  देशभरात चाळीसठिकाणी छापेमारी
  राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एटीएसने देशभरात चाळीस ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात पुणे व ठाणे भागात कारवाई करुन आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या १५ जणांना ताब्यात घेतले होते. कोंढव्यातील दोघांची देखील चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, ही छापेमारी पुणे पोलिसांनी कोथरूडमध्ये पकडण्यात आलेल्या दोन वॉन्टेड दहशतवाद्यांच्या कारवाईच्या तपासानंतर केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

  बुधवार पेठेतून बांगलादेशी महिलांना पकडले
  पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांनी बेकायदा वास्तव्य करत असल्याच्या माहितीवरून नुकतीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी केली होती. तीन महिन्यांपूर्वी ही छापेमारीकरून वेश्यावस्तीतून बांगलादेशी महिलांसह साथीदारांना ताब्यात घेतले होते. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापुर्वी हडपसर व इतर भागातून देखील या बांगलादेशींना पकडले होते.