रस्त्याच्या वादावरून वाईत जोरदार मारामारी, आठ जण गंभीर जखमी

रस्त्याच्या वादावरून वाई शहरात जोरदार मारामारी झाली. या मारहाणीत आठ जण गंभीर जखमी झाले. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

    सातारा  : रस्त्याच्या वादावरून वाई शहरात जोरदार मारामारी झाली. या मारहाणीत आठ जण गंभीर जखमी झाले. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाण प्रकरणावरून पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर वातावरण तणावपूर्ण होते.
    वाई-सातारा रस्त्यावर यशवंतनगर गावच्या हद्दीत मानकुंबरे वस्तीवर जाण्या-  येण्या रस्त्यावरून शामराव मानकुंबरे व मोहन जाधव या दोन लगतदारांमध्ये पूर्वीपासून वाद आहेत. रस्त्यावरून त्या दोघांमध्ये न्यायालयात खटला सुरू आहे .मोहन जाधव यांनी नुकतीच मानकुंबरे वस्तीलगत जागा खरेदी केली आहे. त्याला जाण्या-येण्याचा रस्ता नाही. त्यामुळे ते मानकुंबरे यांच्या मालकीच्या रस्त्यावरूनच जाणे-येणे करत होते. आज सकाळी मोहन जाधव यांनी आपल्या जागेमध्ये बोअर घेण्यासाठी वाहन मागवले होते. वाहन आत घेऊन जाण्यासाठी त्यांनी मानकुंबरे यांना गेट उघडण्यास सांगितले. मात्र या गेटमधून संबंधित गाडी आत जाणार नव्हती. त्यामुळे मानकुंबरेनी या गाडीला आत जाण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्याचे मारामारीत रूपांतर झाले.
    मारहाणीत मोहन जाधव यांच्या बरोबरीच्या अकरा जणांनी मानकुबंरे यांच्या घरातील आठ पुरुष व महिलांना लोखंडी रॉड, लाकडी दाडक्यांनी जोरदार मारहाण केली. तसेच गाडयांच्या काचा फोडून गाड्यांचेही नुकसान केले. यामध्ये मानकुंबरे यांच्या कुटुंबातील काहीजण गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात व नंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
    याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात मोहन सावकार जाधव, किरण घाडगे, रॉकी घाडगे सह अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. मानकुंबरे कुटुंबीयांना मारहाण झाल्याची व्हडीओ क्लिप समाज माध्यमावर फिरल्याने व याची माहिती वाई शहरात पसरताच पोलीस ठाण्याच्या आवारात सकल मराठा व इतर समाजांच्या वतीने मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे आज दिवसभर पोलीस ठाण्याच्या आवारातील वातावरण तणावपूर्ण होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण करत आहेत.