dhule death by shock

इलेक्ट्रिक पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे लहान मुलाला शॉक (Shock To Small Boy) लागला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

    धुळे : धुळ्यामध्ये (Dhule) एक धक्कादायक घटना घडली आहे. विजेच्या खांबाला हात लागून एका आठ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू (Death By Electric Shock) झाला. इलेक्ट्रिक पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे लहान मुलाला शॉक (Shock To Small Boy) लागला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. धुळे शहरातील वडजाई रोड गफुनगर परिसरात काल रात्री नऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

    या लहान मुलासह इतर मुलेदेखील यावेळी खेळत होती. या चिमुकल्याने विजेच्या खांबाला हात लावला असता त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्शद अहमद अशपाक मोमीन (वय आठ वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

    या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळेच या बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईक आणि स्थानिकांनी केला आहे. तसेच वीज वितरण अधिकाऱ्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत, संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे अशीही मागणी केली आहे.

    विशेष म्हणजे या परिसरामध्ये नेहमीच वीज वितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही बहुतांश वेळा परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयामध्ये निवेदन देऊन समस्या सोडवण्या संदर्भात मागणी केलेली आहे. मात्र वीज वितरण विभागातर्फे जाणीवपूर्वक सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केले जात होते.

    वीज वितरण विभागाच्या याच बेजबाबदारपणामुळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, यास कारणीभूत असलेल्या वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर या संदर्भात कठोरात कठोर कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी वीज वितरण विभागाला दिला आहे.