एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, महसूल विभागाचे अधिकारी आता मुक्ताईनगरमध्ये दाखल; वाचा काय आहे प्रकरण?

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधी मंडळात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती. तसेच या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल, असं विखे पाटलांनी जाहीर केलं होतं.

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांप्रकरणी तपास करण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी आता मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढू शकतात. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधी मंडळात एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांची दखल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती. तसेच या प्रकरणी महसूल विभागाकडून तपास केला जाईल, असं विखे पाटलांनी जाहीर केलं होतं. या सर्व घडामोडींनंतर आता अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले आहेत.

    काय आहे प्रकरण?
    विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या नावावर असलेल्या 33 हेक्टर 41 आर जमिनीवर उत्खनन करुन 400 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. तसेच त्यांनी या प्रकरणी एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केलीय.

    काय म्हणाले होते एकनाथ खडसे ?
    एकनाथ खडसे यांनी या आरोपांवर आपली भूमिका मांडलीय. “संबंधित जमीन हायवेला दिलेली आहे. केंद्र सरकारची सूचना आहे की, नॅशनल हायवेला जमीन देत असताना कुठल्याही प्रकारची रॉयलटी लागतच नाही. मग किती हजार ब्रॉस राहिली किंवा दोन हजार राहिली, त्यामध्ये त्यांनी 20 हजार ब्रॉस रॉयल्टी नेलेली आहे, असं सरकारचं म्हणणं आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.