eknath shinde and uddhav thackeray

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार सध्या सुरतमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीला (NCP) साथ द्यायची नाही, असा इशारा शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे.

    मुंबई : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ३५ पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन बंड केलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार सध्या सुरतमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान, यापुढे काँग्रेस-राष्ट्रवादीला (NCP) साथ द्यायची नाही, असा इशारा शिवसेना (Shivsena) नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. यासह आणखी दोन प्रस्ताव शिंदे यांनी ठाकरे सरकारला दिले आहेत. भाजपसोबत सरकार स्थापन करा, मी उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे. यामुळे आता शिंदेंचा प्रस्ताव ठाकरे मान्य करणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    एकनाथ शिंदे हे आधीपासूनच राष्ट्रवादीवर नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी शिवसेनेवर दबाव आणत आहे. शिवाय राज्यात शिवसेनेची सत्ता असण्यापेक्षा राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचं चित्रं आहे. युतीच्या काळात मुख्यमंत्री भाजपचा असला तरी सत्तेचं केंद्र मातोश्री असायचं. आता मुख्यमंत्री शिवसेनेचा असूनही सत्तेचं केंद्र सिल्व्हर ओक झालं आहे. दोन पवारांच्यापुढे आघाडी सरकार जात नसल्याने शिंदे नाराज होते. शिंदे यांच्या बंडामागचं हे एक कारण आहे.

    शिवसेना आणि भाजपची आघाडी व्हावी असं एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीपासूनचं मत होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना आणि भाजपची युती ही स्वाभाविक युती आहे, असं त्यांचं मत होतं. मात्र, एका मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे शिंदे यांच्यासह अनेकजण नाराज होते. त्यामुळेच त्यांनी बंड पुकारल्याचं सांगितलं जातंय.