दिल्ली दौरा कशासाठी ? स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

दिल्ली दौऱ्याविषयी (Eknath Shinde Delhi Visit) एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी हा दौरा मंत्रिमंडळ विस्तारासाठी नसल्याचं सांगितलं आहे.

    दिल्ली : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे आणि फडणवीसांचं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यानंतर महिना उलटूनही राज्यातल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्ष टीका करत आहे. अशातच ६ ऑगस्टला शिंदे व फडणवीस दिल्लीला गेले होते. या दिल्ली दौऱ्याविषयी (Eknath Shinde Delhi Visit) एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी हा दौरा मंत्रिमंडळ विस्तारासाठी नसल्याचं सांगितलं आहे. ते दिल्लीत विमानतळावर पोहोचल्यावर माध्यमांशी बोलत होते.

    एकनाथ शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत बैठक ठेवली आहे आणि उद्या नीती आयोगाची बैठक आहे. ही शासकीय बैठक आहे. मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक दरवर्षी होते. या दोन्ही महत्त्वाच्या बैठकांसाठी मी दिल्लीला आलो आहे.”

    मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याचा आणि राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला. मी शासकीय बैठकांसाठी आलो आहे आणि आमचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. त्याला कोणतीही अडचण किंवा अडथळा नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

    “राज्यातील कोणतंही काम थांबवलेलं नाही. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे निर्णय घ्यायचे ते घेतले आहेत. ते काम कोठेही थांबलेलं नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल,” असंही शिंदेंनी नमूद केलं.