एकनाथ शिंदे चुकले, आनंद दिघे यांचे नाव घेऊन भूमिका मांडू नका,  केदार दिघे यांची टीका

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर हजारो शिवसैनिकांनी दादर येथील शिवसेना भवन येथे हजेरी लावली. एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ही शिवसेना भवन येथे आले होते. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढविली. एकनाथ शिंदे यांच्याही काही भूमिका संघटना वाढण्यासाठी बरोबर होत्या. पण, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाही तर स्वतःचे समर्थक वाढविले.

    मुंबई : शिवसेनेला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा दिघेंचे घराणे शिवसेनेच्या मदतीला धावेल. एकनाथ शिंदे यांचे सध्याचे जे राजकारण सुरु आहे ते दिघे साहेबांच्या विचारधारा आणि एकनिष्ठता याला न शोभणारे आहे. दिघे साहेबांचे ‘गद्दारांना क्षमा नाही’ हे ब्रीदवाक्य आहे. दिघे साहेब शेवटपर्यंत भगव्याशी, पक्षाशी एकनिष्ठ राहिले. पण, त्याच दिघे साहेबांचे नाव घेऊन शिंदे आज जे काही करताहेत त्याला अर्थ नाही, अशी टीका धर्मवीर (Anand Dighe) आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांनी केली आहे.

    एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर हजारो शिवसैनिकांनी दादर येथील शिवसेना भवन येथे हजेरी लावली. एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे ही शिवसेना भवन येथे आले होते. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढविली. एकनाथ शिंदे यांच्याही काही भूमिका संघटना वाढण्यासाठी बरोबर होत्या. पण, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नाही तर स्वतःचे समर्थक वाढविले. कुठल्याही नेत्याने एकट्याने शिवसेना वाढवतोय असे कधीही समजू नये. शिवसेना ही कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सामान्य शिवसैनिकांमुळे उभी राहिली आहे. शिवसैनिक हा सदैव शिवसैनिक असतो. त्याच्यामुळे खरी तर शिवसेना जिवंत असते. काहीही झाले तरी शिवसैनिक भगव्याशी प्रतारणा करत नाही. अनेक नेते आले आणि गेले, पण शिवसैनिक कधी मागे हटला नाही, असे केदार दिघे म्हणाले.

    शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांचा आधार आहे. त्यामुळे शिवसेना याहून जोमाने पुढे जाईल. मी २०१० साली शिवसेना पक्षाचा सदस्य झालो. त्यानंतर युवासेनेचा सदस्य झालो. त्यानंतर मी राजीनामा दिला. कारण, ठाण्यातील राजकारण अत्यंत गलिच्छ होते. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून माझ्यात आत्मविश्वास आहे. मी लाचार नाही. दरवाजे उघडणे आणि पाया पडणे हे माझ्या तत्त्वात बसत नाही. ही संस्कृती मनाला न पटणारी आहे. मात्र, मी दिघे साहेबांचे आणि बाळासाहेबांचे कार्य केले आहे. मी पदावर नसलो तरी शिवसैनिक म्हणून आयुष्यभर राहिल, असेही केदार दिघे यांनी सांगितले.