एकनाथ शिंदेंकडे मोठं संख्याबळ, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत केलं ‘हे’ भाष्य

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)  सरकार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार आहेत. हे सगळेजण सूरतमधून आसाममधील गुवाहाटीला रवाना झाले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

  “आम्ही सर्व आमदार आता एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आम्हा सर्वांची तीच भावना आहे. आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आमदारांचे संख्याबळ आहे”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

  ते पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही पुढची दिशा ठरवण्यासाठी संध्याकाळी एक बैठक आयोजित केली आहे. ती बैठक झाल्यावर तुम्हाला त्याचा निर्णय कळवला जाईल”. शिवसेना आमदाराला मारहाण झाल्याचा दावा केला जात असताना त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

  “गुजरातमध्ये कोणत्याही आमदारांना मारहाण केली नाही.” असेही ते म्हणाले.

  दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे विधानसभा बरखास्तीच्या दिशेने जात असल्याचे संकेत शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिले आहे. “महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीच्या दिशेने,” असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.

  एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत ४० आमदार असून त्यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे असल्याचं आज सकाळी सुरतमधून गुवहाटीमध्ये पोहोचल्यानंतर जाहीर केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील सरकार अल्पमतात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आज संध्याकाळी एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? ते पक्ष सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.