एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटीला; सरकार अल्पमतात?

एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली ३७ ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुंबईत दाखल झाले आहेत.

    मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर (Rebellion) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता स्वतंत्र गट (Independent Group) स्थापन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा गुवाहाटी (Guwahati Airport) विमानतळवरील फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली ३७ ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

    सूरतमध्ये मंगळवारी दिवसभरानंतर रात्री उशिराही राजकीय घडामोडी घडल्या आहेत. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हेदेखील शिवसेनेच्या आमदारांसोबत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. व्हिडिओत आमदार एका निवेदनावर स्वाक्षरी करत असल्याचे दिसत आहे. हे निवेदन विधानसभेत स्वतंत्र गटासाठी मान्यता द्यावी यासाठी होते असल्याचे म्हटले जात आहे.

    एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे पत्र आज राजभवनात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचे सांगून लवकरच विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल देण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या ३७ आमदारांच्या गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाल्यास सरकार थेट अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.