Home Minister Amit Shah
Amit Shah's statement

    अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामात काँग्रेसने अडथळे आणल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (१३ नोव्हेंबर) केला आणि मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास भाविकांना रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल, असे आश्वासन मतदारांना दिले. मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत गृहमंत्री शाह बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही ३ डिसेंबरला भाजपाचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजपा सरकार करेल.
    माझा विश्वास अजूनच दृढ होतो
    अमित शाह यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘लोकसत्ता’च्या बातमीचं कार्ड शेअर करत म्हणाले, “या असल्या बातम्या पाहिल्या की माझा विश्वास अजूनच दृढ होतो. भाजपासाठी प्रभू श्री राम हे फक्त पॉलिटिकल टूल आहेत, बाकी काही नाही. श्रीरामाला यांनी फक्त त्यांच्या राजकारणासाठी वापरलंय.”
    जगभरातील तमाम हिंदूंचा अपमान करणारं
    “शाह यांचं हे विधान देशभरातील, जगभरातील तमाम हिंदूंचा अपमान करणारं आहे. संपूर्ण जगात हिंदू बांधव पसरलेत. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन, मध्य प्रदेशच्या जनतेला मोफत दर्शन घडवण्याचे आमिष दाखवलं जातंय. वास्तविक पाहता, श्रद्धा हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे. त्याचा असा बाजार मांडणं हे जगभरातील रामभक्तांच्या श्रद्धेशी, भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे,” अशी टीका आव्हाडांनी केली.
    अमित शाह नेमकं काय म्हणाले?
    अमित शाह यांनी काँग्रेसवर राम मंदिराचे बांधकाम रोखल्याचा आणि भारतीय संस्कृतीचा अवमान केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसने नेहमीच आपल्या तीर्थक्षेत्रांचा आणि भारतीय संस्कृतीचा अवमान केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिर बांधले, काशी विश्वनाथ कॉरिडॉर बांधला, त्याचबरोबर सोमनाथ मंदिर सोन्याने बनवले जात आहे.’’ पंतप्रधानांनी बद्रीनाथ धाम आणि केदारधामचेही पुनरुज्जीवन केले. रामलल्ला ५५० वर्षांपासून ‘अपमानित’ अवस्थेत होते. काँग्रेस ७० वर्षांपासून राम मंदिराच्या कामात अडथळे आणत होता आणि विलंब करत होता, असंही शाह म्हणाले.