तृतीयपंथीयांच्या समस्या समजून घेण्यासाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार, दीड लाखाच्या फेलोशिपसाठी भरा ‘हा’ अर्ज

तृतीयपंथीयांच्या समस्या या मतदार नोंदणीच्या (Voters Registration) पलीकडे आहेत. त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करत आहे. एक वर्ष कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम (Fellowship For Transgenders) दिली जाणार आहे.

    मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) अखत्यारीत कार्यरत असलेले महाराष्ट्रातील (Maharashtra) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी गेल्या काही महिन्यांत विविध प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नाचा भाग म्हणून तृतीयपंथीयांचे गुरू, दयार यांच्या भेटी घेतल्या गेल्या; तसेच तृतीयपंथीयांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांशी संवाद साधण्यात आला. यातून असे लक्षात आले की, तृतीयपंथीयांच्या समस्या या मतदार नोंदणीच्या पलीकडे आहेत. त्यांच्या या समस्यांचा विविधांगी अभ्यास करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तृतीयपंथी व्यक्तींना पाठ्यवृत्ती देऊ करत आहे. एक वर्ष कालावधीच्या या पाठ्यवृत्तीसाठी दीड लाख रुपये रक्कम दिली जाणार आहे.

    ही पाठ्यवृत्ती तृतीयपंथी व्यक्तींनाच दिली जाणार असून इच्छुक तृतीयपंथीयांनी १० जून २०२२ पर्यंत प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. प्रस्ताव पाठविण्यासाठी https://forms.gle/SiPuqkBzu3ziHNiu7  या गुगल अर्जावरील माहिती भरून अर्ज करावेत. या संदर्भातील अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा साधना गोरे (९९८७७७३८०२) यांच्याशी संपर्क साधावा.