निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर ;  उमेदवारांचे आरोप, राजकीय दबावाखाली काम केल्याचा ठपका

२६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राबविताना प्रशासनाने निवडणूक आयोगाचे नियम आणि कायदे धाब्यावर बसवले आहेत. नेत्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत, असे गंभीर आरोप ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले लोक करु लागले आहेत.

    तासगाव : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया राबविताना प्रशासनाने निवडणूक आयोगाचे नियम आणि कायदे धाब्यावर बसवले आहेत. नेत्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून अधिकारी आणि कर्मचारी काम करत आहेत, असे गंभीर आरोप ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले लोक करु लागले आहेत.
    बुधवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाची भूमिका पक्षपाती असल्याचे आरोप बहूउद्देशीय सभागृहाच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांकडून ऐकायला मिळत होते. अर्जाच्या माघारीसाठी वेळ निश्चित करताना निवडणूक आयोगाचे नियम बासणात गुंडाळण्यात आले. प्रशासनाने प्रत्येक गावासाठी सोईप्रमाणे वेगवेगळे नियम लावले असल्याची चर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात दबक्या आवाजात सुरु होती. बस्तवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज परत घेण्यासाठी दुपारी तीन पूर्वी बहुउद्देशीय सभागृहात आलेल्या व्यक्तिंना नियमावर बोट ठेऊन अर्ज माघारी घेऊन दिले नाहीत. दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडून काही गावातील लोकांना निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवून सायंकाळी साडेचार वाजता त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची सवलत दिली, असे आरोप बस्तवडे गावातील लोक करत होते.

    अर्ध्या तासातच गुंडाळली प्रक्रिया
    याशिवाय उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी अनेक गावांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ध्या तासातच छाननी प्रक्रिया गुंडाळली होती. निर्धारित वेळेत हरकत घेण्यासाठी आलेल्या अनेक गावातील व्यक्तींच्या हरकती घेण्यासाठी टाळाटाळ सुरु होती. छाननी पूर्ण झालेली आहे. हरकत घेता येणार नाही, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना परत पाठविण्यात आल्याचे आरोप बस्तवडे येथील हरकत घेण्यासाठी आलेल्या व्यक्तिंनी केले होते.

    अर्जांच्या आकडेवारीचा सावळा गोंधळ
    ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जाच्या आकडेवारीबाबतही तासगाव तालुक्यात सावळा गोंधळच पाहायला मिळाला. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाने प्रसिध्द केलेली आकडेवारी आणि छाननी नंतरची आकडेवारी तसेच अर्ज माघारी नंतरची आकडेवारी यामध्ये तफावत दिसून येते. यावरुनच तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा कारभार रामभरोसे तर सुरु नाही ना ? अशा शंका उपस्थित केली जात आहे.

    तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन घेणे, छाननी आणि माघार ही प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्देशानुसारच पार पडली आहे. या २६ ग्रामपंचायतीच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केले आहे.

    -रविंद्र रांजणे, तहसीलदार तासगाव