बारामतीमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री सुरु असलेल्या बॅंंकेवर कारवाई; निवडणूक आयोगाची ॲक्शन

बारामतीमध्ये एक बॅंक रात्रीची देखील चालू होती. यावरुन अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

    बारामती : लोकसभा निवडणूकीचे वारे सध्या देशभरामध्ये वाहत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान तिसऱ्या टप्प्यामध्ये पार पडले आहे. मात्र मतदानाच्या आदल्या रात्री बारामतीमध्ये अनेक उलथा पालथ झाली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडिओ शेअर केले. त्यामध्ये बारामतीमध्ये एक बॅंक रात्रीची देखील चालू होती. यावरुन अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

    निवडणूक आयोगाकडून आरोपांची दखल

    बारामतीमध्ये आचारसंहिता लागल्यानंतर रोहित पवार यांनी अनेक फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये एका गाडीत काही नोटा पडल्याचं दिसत होतं. रात्रीच्यावेळी एक बँक उघडी ठेवण्यात आली होती. रोहित पवारांनी उल्लेख केलेली  बॅंक ही पीडीसीसी बँक आहे. रात्रीच्यावेळी बारामतीमध्ये पैसे वाटपासाठी या बँकेचा वापर करण्यात आला, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. आता निवडणूक आयोगाने या आरोपांची दखल घेतली आहे. त्याचबरोबर बॅंक चालकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

    बँक मॅनेजरवर कारवाईचा बडगा

    बारामतीच्या या बॅंकेचे सीसीटीव्ही फुटेज चेक करा अशी मागणी देखील करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज तपासत कारवाई केली आहे. बारामती लोकसभेच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बँक सुरू ठेवल्याने बँक मॅनेजरवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बँक मॅनेजरवर निवडणूक आयोगाने निलंबनाची कारवाई केली आहे. बँक मॅनेजर या प्रकरणात दोषी आढळल्याने कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेज तपासल असता 40 ते 50 कर्मचारी आत आढळून आले. निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. मतदानाच्यादिवशी बारामती लोकसभा मतदारसंघात बराच मोठा ड्रामा घडला होता.