विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेर

विधानपरिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच सदस्यत्वाची मुदत ७ जानेवारी २०२३ रोजी संपत असल्यामुळे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी जानेवारी अखेर निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्याने दिली आहे.

  मुंबई : विधानपरिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच सदस्यत्वाची मुदत ७ जानेवारी २०२३ रोजी संपत असल्यामुळे या रिक्त होणाऱ्या जागांसाठी जानेवारी अखेर निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्याने दिली आहे.

  विधान परिषदेतील शिक्षक आमदार काळे ( औरंगाबाद ), बाळाराम पाटील ( कोकण ) आणि ना. गो. गाणार ( नागपूर ) आणि पदवीधर मतदारसंघाचे डॉ. रणजित पाटील ( अमरावती ), डॉ. सुधीर तांबे ( नाशिक ) या पाच आमदारांच्या पाच सदस्यत्वाची मुदत ७ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी लवकरच केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून भाजपाच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारची ही पहिलीच निडणूक असल्यामुळे या जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिंदे सरकारची कसोटी लागणार आहे. तर, काँग्रेस – राष्ट्रवादी यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.

  कोण असेल मतदार?

  शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मागील निवडणुकीची मतदार यादी वापरली जात नाही. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२२ रोजी नवीन यादी तयार केली जाणार आहे. २३ नोव्हेंबरला मतदार यादीचा प्रारूप मसुदा जाहीर करून ३० डिसेंबरला अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे.

  विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी पदवी प्राप्त होऊन तीन वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. यासोबतच मतदाराचे नाव मतदार संघात असणे आवश्यक आहे.

  शिक्षक मतदार संघांसाठी निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकाने मागील सहा वर्षात किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून काम केले असावे, अशी अट उमेदवारांसाठी आहे.