मजूर फेडरेशनचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 20 जानेवारीला मतदान तर निकाल…

मजूर सहकारी संस्था जीवित ठेवून सहकारी तत्वावर सरकारी कामे मिळण्यासाठी संजीवनी ठरणाऱ्या मजूर फेडरेशन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अडीच वर्षांची मुदतवाढ घेऊन बसलेल्या मंडळास आता पायउतार व्हावे लागणार आहे.

    छत्रपती संभाजीनगर : मजूर सहकारी संस्था जीवित ठेवून सहकारी तत्वावर सरकारी कामे मिळण्यासाठी संजीवनी ठरणाऱ्या मजूर फेडरेशन निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अडीच वर्षांची मुदतवाढ घेऊन बसलेल्या मंडळास आता पायउतार व्हावे लागणार आहे. २० जानेवारी मतदान आणि २१ रोजी मतमोजणी होऊन कोणत्या गटाचे वर्चस्व आहे हे निश्चित होईल.

    कोरोना संसर्गमुळे सहकार चळवळ आणि त्यावर अवलंबून असलेल्या अनेक सहकारी संस्थेच्या निवडणुका लांबल्या होत्या. आधी कोरोना काळ नंतर न्यायालय आणि मराठा आरक्षण आंदोलनामुळे सहकारी संस्थेच्या निवडणुका होत नव्हत्या. अशातच मागील अडीच वर्षापासून मजूर फेडरेशनला मुदतवाढ मिळत गेली. विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांचे बंधू गफ्फार शेख यांच्या पॅनलने कब्जा मिळवला होता. २०२१ मध्ये मुदत संपलेली असताना संचालक मंडळास मुदतवाढ दिली गेली. त्यानंतर जिल्ह्यात पडलेला अवकाळी अन् त्यातून झालेले नुकसान पाहता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नाही.

    अखेर अडीच वर्षानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील ४२३ मजूर संस्था या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असून डोणगावकर आणि सत्तार पॅनल ताबा मिळवण्यासाठी सर्वशक्ती पणाला लावत आहे. सहकार विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २६ डिसेंबर २०२३ रोजी अर्ज दाखल करण्याची दिनांक असून २७ रोजी छाननी होईल.