राष्ट्रवादीमुळेच निवडणुका लांबणीवर ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आराेप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळेच लांबणीवर पडल्याचा  आराेप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महािवकास आघाडीच्या सरकारने जनगणना झाली नसातानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची नव्याने रचना केली हाेती.

  पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळेच लांबणीवर पडल्याचा  आराेप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने जनगणना झाली नसातानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची नव्याने रचना केली हाेती. ताे निर्णय भाजप आणि  शिवसेनेच्या सरकारने रद्द केला. आम्ही निवडणुका घेण्यासाठी कधीही तयार आहाेत असेही त्यांनी नमूद केले. जशा निवडणुका येतील तसे राजकीय ‘बाॅम्बब्लास्ट’ हाेतील असा दावाही त्यांनी केला.
  पुण्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीसाठी बावनकुळे उपस्थित हाेते. यावेळी पत्रकार परीषदेत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्याचा आराेप केला. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारने अधिकार नसताना नवीन प्रभाग रचना केली. २०११ साली झालेल्या जनगणनेत चार टक्के वाढ गृहीत धरून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य संख्या वाढविली, नव्याने प्रभाग रचना केली. हे पुर्णपणे बेकायदेशीर आहे. जनगणना झाल्याशिवाय हे बदल करता येत नाहीत. त्यामुळे राज्यात दहा महीन्यापुर्वी अस्तित्वात आलेल्या सरकारने महाविकास  आघाडी सरकारचा निर्णय रद्द केला. त्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेसने सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यामुळे आमच्यामुळे नाही तर राष्ट्रवादी काॅंग्रेसमुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. आम्ही या निवडणुका कधीही घेण्यास तयार आहाेत.
  यावेळी प्रश्नांना उत्तर देताना, शिवसेनेचे उध्दव ठाकरे, संजय राऊत यांच्यावरही बावनकुळे यांनी टीका केली. शरद पवार यांचे राजीनामा म्हणजे वगनाट्य हाेते असेही त्यांनी नमूद केले.
  आणखी राजकीय ‘बाॅम्बब्लास्ट ’ हाेतील!
  हवेली पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अशाेक टेकावडे हे त्यांच्या हजाराे समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याच पद्धतीने अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जशा निवडणुका येतील तसे अनेक राजकीय ‘बाॅम्बब्लास्ट’ हाेतील असे भाकितही बावनकुळे यांनी व्यक्त केले. ज्या मतदारसंघात पक्ष अपुर्ण आहे, अशा ठिकाणी पक्ष पुर्ण करण्यासाठी इतर पक्षातुन येणाऱ्यांना प्रवेश दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  कुरूलकर यांच्या विषयी सावध उत्तर
  डिआरडीओमधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना दहशतवादी विराेधी पथकाने अटक केली आहे. त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधाबाबत बावनकुळे म्हणाले, पक्षाने त्यावर भूमिका का मांडावी. त्यांची चौकशी सरकारमार्फत केली जात आहे. कोणत्या एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला, तर त्यामुळे संस्थेला अथवा संघटनेला दोष देता येणार नाही. जी व्यक्तीने गुन्हा केला असेल, तर तो गुन्हेगार आहेत. त्यावर कारवाई ही झालीच पाहिजे, ही पक्षाची भूमिका आहे. कोणत्या तो धर्माचा आहे किवा जातीचा आहे, हे बघून भाजप कोणालाही टार्गेट करत नाही’’ यावेळी मात्र कुरूलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे का, या प्रश्‍नांला बावनकुळे यांनी उत्तर देणे सोईस्करपणे टाळले.