पावसामुळे वीजपुरवठा खंडित! मोबाईलच्या उजेडात मतदान

ग्रामीण भागात मोडणाऱ्या मतदान केंद्रावर वीज गेल्यावर कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या दाव्याची पोल खोल झाली आहे.

    पनवेल : अचानक आलेल्या अवकाळी पाऊसामुळे वीज गेल्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १ मधील धानसर गावात चक्क मोबाईलच्या उजेडात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसासनाकडून जय्यद तय्यारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ग्रामीण भागात मोडणाऱ्या मतदान केंद्रावर वीज गेल्यावर कोणत्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने प्रशासनाच्या दाव्याची पोल खोल झाली आहे.

    देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सोमवारी दि १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदार संघात मतदान पार पडले. मतदारांच्या चांगल्या प्रतिसादात सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लहान मोठे वृक्ष कोसळण्याची शक्यता लक्षात घेत महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

    परिणामी ग्रामीण भागात असणाऱ्या मतदान केंद्रात अंधार पडून मतदान प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती. काही काळानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या चार्जिंगच्या बॅटऱ्या आणि मोबाईल टॉर्चच्या उजेडात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असली तरी घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनाच्या दाव्यातील फोल उघड झाली आहे.