लोणंदमध्ये अकरा जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा; चार विद्यार्थिनी गंभीर जखमी

लोणंद येथे पिसाळलेले कुत्र्याने हल्ला करत पाच विद्यार्थिनींसह ११ जणांना जखमी केले. यातील चार विद्यार्थिनी गंभीररीत्या जखमी असून, त्यांना पुढील उपचारासाठी साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरासह शहरात घडली.

    लोणंद : लोणंद येथे पिसाळलेले कुत्र्याने हल्ला करत पाच विद्यार्थिनींसह ११ जणांना जखमी केले. यातील चार विद्यार्थिनी गंभीररीत्या जखमी असून, त्यांना पुढील उपचारासाठी साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरासह शहरात घडली. जखमींमध्ये इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थिनींचा समावेश आहे.
    लोणंद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात आज दुपारी पिसाळलेले कुत्रे आले. या कुत्र्याने विद्यार्थिनींवर हल्ला केला. यामध्ये आरोही गणेश देडे (इयत्ता दुसरी), वेदिका विलास मोरे (इयत्ता चौथी), तनुष्का खरात, वैष्णवी (पूर्ण नाव समजू शकले नाही), जोया सय्यद या पाच विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यातील अरोही, वेदिका, तनुष्का, वैष्णवी या विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

    लोणंद शहरात विशेषतः मटण मार्केट परिसर, बाजारतळ, तसेच शहरातील विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी गावभर फिरताना दिसतात. त्या मोकाट कुत्र्यांचा नगरपंचायतीने लवकरात लवकर बंदोबस्त करावा.

    - सोमनाथ खोमणे (सामाजिक कार्यकर्ते लोणंद)
    त्यानंतर या कुत्र्याने शहरात मंगेश बोडके, प्रकाश माने यांच्यासह सहा जणांना चावा घेतला आहे. दरम्यान, या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यात आला. मात्र, सापडले नाही. त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.