सीईओ स्वामी यांच्याविरुद्ध कर्मचारी संघटनांचा एल्गार ; अवेळी बदल्याबाबत घेतला आक्षेप

झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेत पाच वर्षांपेक्षा एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या २० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.

    सोलापूर : झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेत पाच वर्षांपेक्षा एकाच ठिकाणी कार्यरत असणाऱ्या २० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. या कर्मचाऱ्यांना बाबत लेखी तक्रारी किंवा चौकशी नसताना त्यांना वादग्रस्त ठरवून केलेल्या या बदल्यांना कर्मचारी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या बदल्या त्वरित रद्द करा नाहीतर काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे निवेदन याबाबत निवेदन दिले आहे.ग्राम विकास विभागातील शासन निर्णयातील तरतुर्दीप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या बदल्या जून, जुलैमध्ये करण्याच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे ही बदली प्रक्रिया होणे अपेक्षित होते. परंतु, सद्यस्थितीत शिक्षण विभागाकडील झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने या बदल्या झाल्या आहेत. तक्रारीवरून कर्मचाऱ्यांच्या बदल्या करावयाच्या झाल्यास त्या तक्रारीची चौकशी करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्त यांना पाठवल्यानंतर आयुक्तांचे आदेश आल्यानंतरच बदल्या करण्याचा नियम आहे. पण झेडपी सीईओ स्वामी यांनी चुकीची प्रक्रिया राबवली अशी भूमिका संघटनेच्या वतीने घेण्यात आली आहे.

    सीईओ स्वामी यांनी बदल्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही तक्रारी नसताना, सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून करण्यात आलेल्या बदल्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबात चिंता पसरली आहे. कोणतीही चुक नसताना, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून केलेली बदली ही कर्मचाऱ्यांसाठी बदनामीची ठरत असल्याची भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी झेडपी प्रशासना विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    दबावतंत्र कशासाठी?

    जिल्हा परिषदेत अनेक अनिष्ट प्रकार उघडकीस आले आहेत. अशा प्रवृत्तीबद्दल संघटनानी आतापर्यंत कोणतीच भूमिका घेतलेली नाही. बदल्या झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काहींच्या तक्रारी आहेत. त्यांच्याबरोबर इतर कर्मचाऱ्यांनाही “लक्ष’ करण्यात आल्याचे दिसत आहे. यापूर्वी संघटनेच्या जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मवाळ भूमिका घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. पण त्यांच्याआड दोषी कर्मचाऱ्यांना लपवू नका, याबाबत संघटनांची भूमिका दिसत नसल्याची प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.