मराठ्यांचा पुन्हा एल्गार; मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार गावोगावी साखळी उपोषण

मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार १ डिसेंंबरपासून मराठा समाजाने उपोषण सुरु केले आहे. प्रत्येक तालुक्यात अन् तेथील गावांमध्ये साखळी उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारपासून पुन्हा मराठ्यांचा एल्गार पहावयास मिळत आहे.

  सातारा : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार १ डिसेंंबरपासून मराठा समाजाने उपोषण सुरु केले आहे. प्रत्येक तालुक्यात अन् तेथील गावांमध्ये साखळी उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी शुक्रवारपासून पुन्हा मराठ्यांचा एल्गार पहावयास मिळत आहे.

  मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील मायणी, कराड, सातारा, मेढा, वाई मोठ्या सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी १ डिसेंबरपासून गावोगावी साखळी उपोषण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार हे आंदोलन पुन्हा गतीमान होत आहे.

  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे सुरु असलेल्या आंदोलनस्थळी शासनाच्या शिष्टमंडळाने भेट दिली. त्यामध्ये जरांगे पाटील यांनी शासनाला दोन महिन्याची मुदत दिली. त्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्कलनिहाय साखळी उपोषण तसेच गावबंदीचे आंदोलन चांगले पेटले होते. जरांगे पाटील यांनी आंदोलनाला स्थगीती दिल्यानंतर जिल्ह्यातील आंदोलनाची धगही कमी झाली तरीही काही तालुक्यात साखळी उपोषण अद्यापही सुरु आहे.

  मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनाच्या ३७ व्या दिवशी साखळी उपोषण सुरु आहे. यासाठी बोरगाव आणि पाटेश्वर येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत. शासनाला जाग येणे गरजेचे आहे. आज मराठ्यावर झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडण्यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडला आहे. यासाठी आमचा लढा आता गावोगावी सुरु राहणार असल्याचे आंदोलकानी सांगितले.

  .…तर २४ डिसेेंबरनंतर जनावरांसह आंदोलन

  जिल्हाधिकारी कार्यालय येथे मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. त्याचा आज ३७ वा दिवस आहे. पण अद्यापही आरक्षणाचा विषय संपला नाही, त्यामुळे दि. १ डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरु आहे. त्याशिवाय २४ डिसेंबरनंतर आमच्या गुरं ढोरासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंंदोलनास बसणार असल्याचा इशारा या आंदोलकांनी दिला.