सांगलीत शिक्षण, नोकऱ्यांसाठी एल्गार! खासगीकरणाचा घाट घालून व्यवस्था मोडखळीस सरकारचे धोरण : आ. लाड

शिक्षण आमच्या हक्काचे - नाही कोणाच्या बापाचे,  बहुजनांचे शिक्षण वाचवा, नोकऱ्यातील कंत्राटीकरण रद्द करा एकच मिशन, वाचवा महाराष्ट्राचे शिक्षण समूहशाळा धोक्याची, ती नाही आमच्या फायदायची आशा घोषणा देत आज सांगलीत शेकडोंच्या संख्येत एल्गार करण्यात आला.

    सांगली : शिक्षण आमच्या हक्काचे – नाही कोणाच्या बापाचे,  बहुजनांचे शिक्षण वाचवा, नोकऱ्यातील कंत्राटीकरण रद्द करा एकच मिशन, वाचवा महाराष्ट्राचे शिक्षण समूहशाळा धोक्याची, ती नाही आमच्या फायदायची आशा घोषणा देत आज सांगलीत शेकडोंच्या संख्येत एल्गार करण्यात आला. पुणे पदवीधर विधानपरिषद मतदार संघाचे आमदार अरुण लाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. येथील कर्मवीर चौकातील भाऊराव पाटील पुतळ्याला अभिवादन करून सांगली जिल्हा बहुजन शिक्षण हक्क विचारमंच, सांगली आयोजित विराट मोर्चा स्टेशनचौकात महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून भव्य सभेत रूपांतरित झाला.
    यावेळी आ. सुमनतई पाटील, माजी आ. भगवानराव साळुंखे, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, सुभाष पाटील, धनाजी गुरव, डॉ. भारत पाटणकर, विश्वनाथ मिरजकर, व्ही. वाय. आबा पाटील, बाबूराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
    आमदार लाड म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावाने समूह शाळा या गोंडस नावाखाली राज्यातील १४ हजार शाळा बंद करून, बहुजन समाजातील दोन लाख लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. राज्य सरकारी सेवेतील १३६ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा शासन आदेश नव्या पिढीचे भवितव्य अस्थिर व अकार्यक्षम करणारा आहे. दत्तक शाळा योजनेच्या नावाखाली राज्यातील ६२,००० सरकारी शाळा उद्योगपती व धनिकांच्या घशात घालण्याचा निर्णय जनसामान्यांचे जीवन संकटात टाकणारा आहे.

    शाळा बंद करण्याचा घाट
    खेडोपाडी जाणारी एसटी बंद केली, आता शाळा बंद करण्याचा घाट आहे, फक्त ते लोकांनी बंद केल्या असं दाखवण्याचा प्रयत्न केला जणार आहे. मोफत शिक्षण बंद करून गुलामी आणायची आहे, दिल्ली सरकारला जर जमते, तर आपल्या सरकारला का जमत नाही. जयंत पाटील यांनी मॉडेल स्कुल योजना जिल्ह्यात राबवली होती. राज्यभर मोफत आणि चांगले शिक्षण हा आमचा हक्क आहे, तो आम्ही टिकवणारच असा इरादा त्यांनी बोलून दाखवला. आ. सुमनताई पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी रोहित शिंदे, विद्यार्थीनी अबोली चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. मोर्चाला  बाळासाहेब होनमोरे, गौतमीपुत्र कांबळे, आर.एस.चोपडे, विकास मगदूम, संपतराव पवार, किरण लाड, उमेश देशमुख, दादासाहेब डांगे, राजेंद्र कुंभार, चिमण डांगे, सर्व शिक्षक संघटना, विद्यार्थी, युवक, युवती उपस्थित होते.

     कंत्राटीकरण मागेची घोषणा दिशाभूल करणारी
    आमदार लाड म्हणाले, कंत्राटीकरण निर्णय रद्द केला म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले, पण शासन निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घ्यावी लागते, त्यांच्याकडे याबाबतचा लेखी आदेशाची मागणी केल्यावर बैठक झाली नाही, म्हणून सांगतात. ही एकप्रकारे दिशाभूल आहे, एमपीएससी असणाऱ्या मुलांना नियुक्त्या दिल्या जात नाहीत. दुसरीकडे कंपनीकरण सुरू असल्याचा आरोप लाड यांनी केला.

    देशाची सुरक्षा खासगी हातात
    देशात सैन्य भरती सुद्धा चुकीच्या पद्धतीने घेतली जात आहे. देशाची सुरक्षा सुद्धा खासगीकरण केले जात आहे, हे चालणार नाही. नको तिथे निधी खर्च होतो आणि शिक्षणाला निधी नाही म्हणून सांगता आता हे चालणार नाही. आरोग्य सेवा आमच्या हक्काची मिळत नाही, नव्या शिक्षण धोरणाचे स्वागत पण आधी प्राथमिक सुविधा द्या,  गोर गरिबांचे शिक्षण हिसकावून घेऊ देणार नाही. गल्ली पासून दिल्ली पर्यंत देश अस्वस्थ, केवळ केवळ अदानी-अंबानी खुश आहेत. असेही आ. लाड म्हणाले.

    समाज सुधारकांचे रचनात्मक काम धुळीस मि‌ळविले जात आहे
    १८ हजार शाळा बंद करून दारूच्या दुकानांना परवानगी देत आहे, म्हणजे आम्हाला व्यसनाधीन करत गुलाम बनवायची ही पद्धत आहे. महात्मा फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा या समाजसुधारकांच्या मालिकेतील कृतिशील समाज सुधारकांचे रचनात्मक काम आज धुळीस मिळवले जात आहे.